नाशिक- लोकांना मूर्ख बनविण्यात शिवसेना आणि भाजपचा हात कोणीच धरू शकणार नाही. गेली चार-साडेचार वर्षे एकत्र नांदताना सजग सासू-सुनासारखे भांडताना उध्दव ठाकरेंनी कमळाच्या पाकळ्या-पाकळ्या वेगळ्या केल्या तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघाच्या जबड्यात हात घालण्याची हिम्मत असल्याची भाषा केली. या दोन्ही पक्षांनी केवळ देखावा उभा करुन लोकांना मूर्ख बनविले. आधी‘एप्रिल फूल’ वर्षातून एकदाच करायचे असते, पण या दोन पक्षांनी दररोजच लोकांना एप्रिल फूल करुन फसविले आहे, अशी टीका समीर भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत केली.
सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक भारतीय नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासनाला हरताळ फासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला मूर्ख बनविले. तर, नाशिकला दत्तक घेण्याचे वचन देणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिककरांची फसवणूक केली. राम मंदिरासाठी अयोध्येत जाऊन पूजा करणाऱ्या उध्दव ठाकरेंनी केवळ राम भक्तांची नाही तर रामाचीही फसवणूक केली. ‘आधी मंदिर मग सरकार’ अशी घोषणा करणाऱ्या उध्दव ठाकरे यांनी सत्तेसाठी लाचार होऊन मोदी-शहापुढे शरणागती पत्करली आहे. तेंव्हा जबड्यात हात घालून वाघाची बत्तिशी भाजपाने उतरविल्याची प्रतिक्रियाही लोकांमध्ये उमटली आहे.
एप्रिल फूल करण्यात नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस जितके तरबेज आहेत, तितकेच तरबेज नाशिकचे शिवसेना आणि भाजपचे खासदार-आमदार आहेत. विकास कामे करता आली नाही म्हणून या भगव्या लोकांनी दररोज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नावाने शिमगा साजरा करत लोकांना मूर्खात काढले आहे. नजरेत भरणारे एकही विकास काम यांच्याकडे नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या ५ वर्षात एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. इकडे हेमंत गोडसे पत्रकारांना मुलाखत देण्यास घाबरतात, अशी टीकाही समीर भुजबळ यांनी केली.
आघाडी सरकारच्या सन २००९ ते २०१४ या कार्यकाळात नाशिकमध्ये अनेक मोठमोठे प्रकल्प आले. वेगवान रस्ते तयार झाले. पर्यटन स्थळे विकसित झाली. नाशिक वेगाने पुढ जात होते. मात्र गेल्या ५ वर्षात कुठलीही नवीन योजना किंवा प्रकल्प आले नाहीत. त्यामुळे, नाशिकच्या विकास वेगाला शिवसेना-भाजपा युतीचा ‘स्पीड ब्रेकर’ हटविण्याची जबाबदारी लोकांचीच आहे. यावेळी आघाडीतर्फे भाजप शिवसेना सरकारला प्रश्न विचारणाऱ्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.
पुस्तिकेतील काही प्रश्न
१. नाशिक दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी नाशिकला काय दिले?
२. नाशिक शहरात कुठली नवीन विकास कामे अथवा नवीन प्रकल्प आला का? मागील काळात सुरु असलेले प्रकल्प बंद का पडलेत?
३. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. मात्र किती तरुणांना रोजगार दिला? सुरु असलेले रोजगार कसे बुडालेत?
४. विदर्भ मराठवाडयातील उद्योगांना विजेचा वेगळा दर आणि नाशिकला वेगळा दर दिल्याच्या प्रश्नावर हेमंत गोडसे गप्प का होते?
५.नाशिक मधील आयटी पार्क अद्यापही सुरु का नाही झाला? नेमकी अडवणूक कुणी केली?
६. नाशिकमध्ये कुठले नवीन उद्योग आलेत का?
७. स्मार्ट सिटी करण्याचे स्वप्न दाखविले नाशिक स्मार्ट सिटी झाले का?
८. नाशिक शहर विकास नियंत्रण नियमावली बाबत इतर शहरांच्या तुलनेत नाशिकवर अन्याय होत असतांना हेमंत गोडसे गप्प का होते?
९. नाशिक शहर विकास नियंत्रण नियमावलीमध्ये किमान ५ वर्षे सातत्य ठेवणार होते ते का ठेवले नाही?
१०. शहरातील नागरिकांना शुद्ध हवा मिळावी, यासाठी शहरात हिरवीगार उद्याने योजना राबवणार त्याचे काय झाले? सुरु असलेल्या योजना बंद का पडल्या?
११. गोदातीराचा विकास करून गोदावरी शुद्धीकरण प्रकल्प राबविणार होते त्याचे काय झाले?
१२. समीर भुजबळांच्या कार्यकाळात झालेले नाशिक विमानतळ पूर्ण क्षमतेने सेना भाजप का सुरु शकले नाही?
१३. समीर भुजबळांच्या कार्यकाळात तयार झालेले कलाग्राम आणि बोटक्लब का पूर्ण करू शकले नाही? बोटी कुणी आणि कुठे पळविल्यात?
१४. समीर भुजबळांच्या काळात मंजुरी मिळवून आणलेला नाशिक पुणे रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र, नाशिक पुणे रेल्वेमार्ग प्रकल्प केवळ सर्वेक्षणात का अडकवून ठेवला? नाशिक-पुणे रेल्वे आजपर्यंत का सुरु होऊ शकली नाही?
१५. नाशिक लोकसभा मतदार संघात पर्यटनाचे कुठले नवीन प्रकल्प का आले नाहीत?
१६.सेना भाजपच्या हेमंत गोडसेंनी दत्तक घेतलेले गावाचा विकास का नाही. का होऊ शकला नाही?
१७. नाशिक कृषी उद्योगाचे, अन्नप्रक्रियेचे व कृषीमाल निर्यातीचे केंद्र बनविणार होते. ते का होऊ शकले नाही?
१८. कृषीमालाला हमी भाव मिळवून देऊ, अशी घोषणा करणाऱ्या युती सरकारकडून कांद्याचे आणि द्राक्षाचे भाव कोळसल्यावर सरकारने तोडगा का काढला नाही?