नाशिक :मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.याच अनुषंगाने नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृद्धीचा जागर करणार असल्याचे प्रतिपादन संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले आहे.
भाषा ही समाजाला बांधून ठेवण्याचे काम
नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटी येथे 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपाच्या भूमिपूजन कार्यक्रमच्या वेळी भुजबळ बोलत होते.
भुजबळ म्हणाले, भाषा ही समाजाला बांधून ठेवण्याचे काम करत असते.आई प्रमाणे अथांग असणाऱ्या मराठी भाषेला अधिक संपन्न, समृद्ध असल्याचे सिद्ध करण्याची संधी नाशिककरांना मिळाली असून या संधीचे सोने नाशिककर केल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
कुसुमाग्रज नगरीत रूपांतर
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने भुजबळ नॉलेज सिटीचे कुसुमाग्रज नगरीत रूपांतर होण्याऱ्या साहित्य संमेलनाच्या कामाची सुरुवात आजच्या भूमीपूजनातून होत आहे. नाशिक ही मुळातच साहित्याची नगरी असून साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जगासमोर नाशिकची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने संपूर्ण शहराचे कलात्मकतेने सजविण्यात येऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. तसेच संमेलनाच्या निमित्ताने येणाऱ्या साहित्यिकांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. या भूमीपूजन कार्यक्रमानंतर संमेलनाच्या कामाला वेग प्राप्त होणार असून सर्वांनी उत्साहाने कामाला लागावे, असेही स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी सांगितले आहे. साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठी कादंबरीकार विश्वास पाटील, गीतकार जावेद अख्तर तर समारोप कार्यक्रमासाठी खासदार शरदचंद्र पवार आणि जेष्ट साहित्यिक माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आदी उपस्थित राहणार असल्याचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले आहे.