नाशिक- डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने वर्षा शिरसाठ या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यामुळे डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यातील पोलिसांना घेराव घातला.
पोलिसांना घेराव; डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
वर्षा शिरसाठ यांना जुळी मुलं असल्याने त्यांच्या गर्भ पिशवीवर टाके टाकण्याची लहानशी शस्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली.
वर्षा शिरसाठ या चार महिन्याच्या गर्भवती होत्या. त्यांना जुळी मुलं असल्याने त्यांच्या गर्भ पिशवीवर टाके टाकण्याची लहानशी शस्रक्रिया करण्यात येणार होती. यासाठी त्यांना 28 एप्रिलला सकाळी 9 वाजता नाशिकच्या नवजीवन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी बाहेरील इतर डॉक्टरांना बोलून वर्षा यांची प्रकृती स्थीर करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळाने त्यांची प्राणज्योत मालवली.
शस्रक्रिया करण्याअगोदर देण्यात येणाऱ्या भुलीच्या ओव्हर डोसमुळे वर्षा यांचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये हसत जाणाऱ्या वर्षाचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप वर्षाच्या कुटूंबीयांनी केला. नवजीवन हॉस्पिटलच्या डॉक्टर नेहा लाड यांच्यासह त्यांच्या सहकारी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही नातेवाइकांनी केली आहे.