नाशिक - शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी तडीपार गुन्हेगारांचे फोटो सार्वजनिक केले असून त्याच्या कॉपीज् प्रत्येक पोलीस ठाण्यांबाहेर लावण्यात आल्या आहेत. या फोटोंचे बॅनर देखील छापण्यात आले असून हे गुन्हेगार आढळल्यास संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नाशकातील गुन्हेगारी रोखण्यासाठी तडीपारांचे फोटो सार्वजनिक; चौक्यांबाहेर लावले फ्लेक्स
नाशकातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी तडीपार गुन्हेगारांचे फोटो सार्वजनिक केले असून त्याच्या कॉपीज् प्रत्येक पोलीस ठाण्याबाहेर लावण्यात आल्या आहेत. या फोटोंचे बॅनर देखील छापण्यात आले असून हे गुन्हेगार आढळल्यास संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नाशिक शहरात मागील महिन्यापासून गुन्ह्यांच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे नागरिक आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत आहे. गेल्या काही दिवसांत खून, चोऱ्या, चेन स्नॅचिंग, बॅग लिफ्टिंग सारखे गुन्हे घडत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये तडीपार केलेले गुन्हेगार परिसरात दहशत निर्माण करत असल्याचे समोर आले आहे. यावर आता पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी गुन्हेगारांच्या नाड्या कसायला सुरुवात केलीय. त्यांच्या आदेशानंतर शहरातील सर्वच पोलीस ठाणी आणि चौक्यांबाहेर त्या-त्या भागातील तडीपार गुन्हेगारांचे बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच तडीपार गुन्हेगार शहरात आढळून आल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी दूरध्वनी क्रमांक देण्यात आला आहे.
शहरातून 153 गुन्हेगार तडीपार
दहशत निर्माण करण्यासाठी मारामाऱ्या करणे, धमक्या देणे, खंडणी वसूल करणे, दंगल माजवण्याचा प्रयत्न करणे किंवा दंगल करण्यासाठी चिथावणी देणे, तसेच दोन पेक्षा अधिक गंभीर गुन्हे असल्यास पोलीस त्या गुन्हेगाराला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार करतात. सर्व सामान्य नागरिकांना सुरक्षित वाटावे, यासाठी मुंबई पोलीस कायदा 1951 कलम 56 अतर्गत गुन्हेगारांना तडीपार करण्यात येते. आता पर्यंत नाशिक शहरातून 153 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलं आहे.