नाशिक -शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळणे कठीण झाले आहे. अशात खाकी वर्दीतील नाझीम शेख यांनी सामजिक बांधिलकी जपत चक्क बँकेतून कर्ज काढून परिसरातील रुग्णांनसाठी ऑक्सिजन मशीन विकत घेत माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
कोणी बेड देत, का बेड" अशी काहीशी परिस्थितीत नाशिकमध्ये बघायला मिळत आहे. कोरोना बधितांचा आकडा झपाट्याने वाढत असून सरकारी तसेच खासगी हॉस्पिटल मधील सर्व बेड फुल झाले आहेत. दुसरीकडे शेकडो रुग्णांचे नातेवाईक बेड मिळवण्यासाठी हॉस्पिटलच्या पायऱ्या झिजवत आहे. अशा बिकट परिस्थिती नाशिकच्या प्रभाग 3मध्ये राहणारे, पोलीस शिपाई नाझीम शेख यांनी खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. आजूबाजूला ऑक्सिजन बेड मिळवा म्हणून रुग्णांच्या नातेवाइकांची परवड बघत शेख यांनी चक्क बँकेतून कर्ज काढून परिसरातील नागरिकांसाठी ऑक्सिजन मशीन खरेदी केले आहे.
सामाजिक कार्याची आवड -
नाशिकच्या प्रभाग क्रमांक 3 मधील रासबिहारी लिंक रोडवरील सरस्वती नगर येथील सागर स्पंदन सोसायटीतील 31 वर्षे नाझीम शेख हे मूळचे नाशिकचे, आई-वडिलांनी मोलमजुरी करत नाझीम चे शिक्षण पूर्ण केले. नाझीम यांनी ही आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून पुढे पोलीस भरतीत नाव कमवले. सद्यस्थितीत शेख नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. नझीम यांना बालपणापासूनच सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी राहत्या परिसरातील नागरिकांना एकत्र आणण्यासाठी सरस्वती नगर मित्र मंडळाची स्थापना केली. या ठिकाणी अनेक सामाजिक कार्यक्रम घेतले जातात. सध्या नाशिकमध्ये कोरोना विषाणूचा थैमान घातले असून दिवसेंदिवस बाधित रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न देखील सुरू आहेत. मात्र, आजच्या परिस्थितीत ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड मिळणे कठीण झाले आहे. कोरोनाचा प्रदूर्भाव रोखण्यासाठी आरोग्य कर्मचारी, पोलीस अहोरात्र काम करत आहे. अशा परिस्थितीत आपल्या परिसरात कोणाला ऑक्सिजनची गरज पडल्यास ती उपलब्ध करणे फारच कठीण झाले आहे. अशात काही जण यंत्रणेला दोष देत आहेत, तर काही जण आपापल्या परीने मदतीसाठी पुढे येत आहे पोलीस शिपाई नाझीम शेख यांनी या ही पलीकडे जाऊन वेगळी शक्कल लढवत त्यांनी कर्ज काढून स्वखर्चाने लाईटवर चालणारे व स्वच्छ पाण्यापासून ऑक्सिजन तयार करणारे मशीन विकत घेतले आहे.
त्यामुळे परिसरातील एखाद्या बाधित रुग्णांला ऑक्सिजनची आवश्यकता भासल्यास ते मशीन त्याच्या वापरासाठी विनामूल्य दिले जाणार आहे. नाझीम शेख यांनी जाती धर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांना चपकार देत खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. त्यांच्या सामजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.