नाशिक- शहरातील मुथूट फायनान्समध्ये १४ जानेवारीला सहा दरोडेखोरांनी गावठी पिस्टलचा वापर करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मुथूट फायनान्स मधील अधिकारी सॅमी सॅम्युअल यांचा गोळीबारात मृत्यू झाला होता. या प्रकरणातील प्रमुख आरोपी आकाशसिंग राजपूत याला नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने बिहारमधील आरा जिल्ह्यातून मोठ्या शिताफीने अटक केली, अशी माहिती नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास-नांगरे पाटील यांनी दिली.
मुथुट फायनान्स दरोड्यातील आरोपीला अटक केल्याची माहिती देताना पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील नाशिक येथून पोलीस पथक बिहारमधील पाटणा येथे आकाशसिंगच्या मागावर गेले होते. तेथे त्यांनी दानपूर, राजूनगर पोलीस ठाण्यात जाऊन, अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांना गोपनीय बातमीदारांमार्फत बिहार राज्यातील भोजपूर जिल्ह्यामध्ये आकाशसिंग राजपूत नावाची व्यक्ती वेश बदलून त्याच्या गावातील मित्राकडे राहत असल्याची माहिती मिळाली. मात्र, त्या ठिकाणाहून देखील आकाशसिंग फरार झाला. पोलिसांना तेथील स्थानिक भाषेची अडचण येत असल्यामुळे त्यांनी एक दिवस फक्त भाषेचा अभ्यास केला. यानंतर तेथील गावांमध्ये बिहारी लोकांचा वेश परिधान करून सदर गावांमध्ये आकाशचा शोध घेतला.
विष्णू नगर भागात एका मैदानात आकाशसिंगची स्विफ्ट कार पोलिसांना सापडली. पोलिसांनी सात दिवस गाडी जवळ बिहारी वेशात सापळा रचला. मात्र, आकाशसिंग त्या ठिकाणी फिरकला नाही. त्यानंतर 23 जुलै रोजी पोलिसांना चांदी या गावामध्ये आरोपी आकाशसिंगचा शोध घेतला असताना, तो विष्णुनगर येथे गाडी घेण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. आकाशसिंगच्या गाडीपासून पोलीस 30 मीटर लांब थांबले होते. यानंतर गाडी घेण्यासाठी आलेली व्यक्ती आकाशसिंग असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. तब्बल 16 दिवसानंतर आकाशसिंगला पकडण्यात पोलिसांना यश आले.
आकाशसिंग हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्यावर उत्तर प्रदेश, बिहार या ठिकाणी सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. आकाश हा बिहार येथील अतिशय कुख्यात गुन्हेगार सुबोध सिंग यांच्यासाठी काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुथूट फायनान्सवर दरोडा टाकण्याचा प्लॅन सुबोध सिंग आणि मनीष सिंग यांनी केला असून त्यांना अटक करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील, पोलीस निरीक्षक ढमाळा, पोलीस उपनिरीक्षक सोनवणे, पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.