नाशिक - शेतकरी बांधवांसोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या लाडक्या सर्जा-राजाचा बैलपोळा हा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकरी बांधवांची बाजारपेठेत गर्दी होताना दिसत आहे. तसेच शहरात राहणाऱ्या नागरिकांकडून मातीची बैलजोडी खरेदी करण्यासाठी लगबग सुरू आहे.
हेही वाचा... अहो ऐकलंत का..? उस्मानाबादेत पार पडले 'गंगा' गाईचे डोहाळे जेवण
यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने आपल्या ढवळ्या-पवळ्याला सजविण्यासाठी झूल, रंगीबिरंगी गोंडे, घंट्यांच्या माळा आदी साहित्य खरेदीसाठी गुरुवारी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली होती. गुरुवारी दिवसभर बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण दिसून आले. शेतकऱ्यांसोबत शेतीत राबणाऱ्या त्याच्या सुख-दु:खात सोबत राहणाऱ्या ढवळ्या पवळ्याचा सण म्हणजे बैलपोळा. शेतात काबाडकष्ट करणाऱ्या आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण शेतकरी थाटात साजरा करत असतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी करीत सजावट साहित्य खरेदी केले.