नाशिक - लोकसभा निवडणुकीतील नाशिक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्या सर्वच उमेदवारांचा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी एक व्हॉटसअॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपद्वारे आचारसंहिता पालनासह निवडणुकीसंदर्भातील सर्व माहिती दिली जात आहे. विशेष म्हणजे याबाबत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी पुढाकार घेत तसे पत्रही संबंधितांना दिले आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणारे सर्व उमेदवार एकाच व्हॉट्सअॅप ग्रुपवर
देशातील हा पहिलाच अनोखा उपक्रम असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या ग्रुपच्या माध्यमातून उमेदवाराला कुठलीही माहिती अथवा अडचण आल्यास त्याचे काही वेळात निराकरण होण्यास मदत होणार आहे.
यंदा निवडणूक अतिशय पारदर्शक आणि निर्भीड वातावरणात पार पडावी. तसेच कुठलाही कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने विशेष नियोजन केले आहे. त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी नाशिक जिल्ह्यात होताना दिसून येत आहे.
उमेदवारांनी प्रचारात जोर पकडला आहे. त्यामुळे नियमित होणारा खर्चचा तपशील दिला जात आहे. तसेच या व्हॉटसअॅप ग्रुपवर फक्त जिल्हा निवडणूक अधिकारीच पोस्ट करू शकतात. या माध्यमातून उमेदवाराला सूचना, निर्णय आणि माहिती दिली जात आहे.