नाशिक - उत्तर महाराष्ट्रात व्यापाऱ्यांकडून द्राक्ष,कांदा, केळी उत्पादक शेतकऱ्यांची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. मागील तीन महिन्यांच्या काळात 1 हजार 163 शेतकऱ्यांची तब्बल 44 कोटी 47 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
नाशिक विभागातील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा; आत्तापर्यंत 199 व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल - नाशिक परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक
उत्तर महाराष्ट्रात व्यापाऱ्यांकडून द्राक्ष,कांदा, केळी उत्पादक शेतकऱ्यांची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. मागील तीन महिन्यांच्या काळात 1 हजार 163 शेतकऱ्यांची तब्बल 44 कोटी 47 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
व्यापाऱ्यांनी माल खरेदी करून घेतला मात्र पैसेच दिले नसल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्यानंतर तात्काळ चौकशी करत 199 व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर काही व्यापाऱ्यांनी 6 कोटी 76 लाखांची रक्कम परत केली आहे. अद्याप 5 कोटी 85 लाख रुपये परत देण्याचं काही व्यापाऱ्यांनी आश्वासन दिलं आहे. मात्र ज्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांनी दिला आहे.
नाशिक विभागात तीन महिन्यात 1 हजार 192 व्यापाऱ्यांविरोधात फसवणुकीच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत. यापैकी 199 व्यापाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील सर्वाधिक 181 गुन्हे नाशिक जिल्ह्यातील असून यापैकी 177 व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना रक्कम परत केली आहे. याचबरोबर सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे अमिष देणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येत आहे. कोणासोबतही अशा प्रकारे फसवणूक झाल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन दिघावकर यांनी नाशिककरांना केले आहे.