नाशिक- पंचवटी परिसरात एका २२ वर्षीय विवाहित तरुणीवर दोन नराधमांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास २ जणांनी तरुणीला जबरदस्तीने रिक्षातून पळवून नेत विविध ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने सोमवारी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या ठिकाणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्याऐवजी दुपारपर्यंत बसवुन ठेवले. त्यामुळे सामान्य जनतेने कोणाकडे दाद मागयची, अशी चर्चा परिसरात होत आहे.
बावीस वर्षीय तरुणीला २ अज्ञातांनी रविवारी रात्री दहाच्या सुमारास जबरदस्तीने रिक्षातून फूस लावून पळवून नेले. या दोघांनी पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डच्या गाळ्याच्या गच्चीवर नेले. याठिकाणी अज्ञातांनी तरुणीवर सामूहिकपणे बलात्कार केला. यानंतर पीडितेला रिक्षात बसवून इरिगेशन कॉलनीच्या मागील बाजूस नेले. त्याठिकाणी पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पीडितेला नराधमांनी तिच्या घराच्या परिसरात सोडून पलायन केले. दरम्यान, पत्नी घरातून कोणाला काही न सांगता गेल्याने तिच्या पतीने पंचवटी पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
सोमवारी सकाळी पीडित तरुणी घरी परतताच तिने कुटुंबीयांसमोर घडलेला प्रकार कथन केला. त्यांनी तडक पंचवटी पोलीस ठाणे गाठले. मात्र, या ठिकाणी पीडितेला न्याय मिळण्यापेक्षा हे प्रकरण कौटुंबिक आहे. त्यामुळे येथून निघून जा, असे सांगण्यात आले. त्यानंतर संबंधित पीडिता व तिच्या कुटुंबीयांनी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटीलांची भेट घेताच पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरु केल्या. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात २ जणांविरोधात पळवून नेणे, सामूहिक बलात्कार करणे, या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक ए. व्ही. मोरे करत आहेत.
पीडितेची तब्येत सध्या अत्यंत नाजूक आहे. तिला चालता व बसता येत नाही. विशेष बाब म्हणजे सामूहिक बलात्कार सारखी गंभीर घटना घडूनही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल न करता आधी गुन्हा दाखल करून घेणे, पंचवटी पोलिसांना संयुक्तिक वाटले. त्यामुळे गुन्हा दाखल करून झाल्यानंतर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
- आर्थिक देवघेवचा पोलिसांवर आरोप?
पीडित महिलेला रिक्षातून नेत असताना रात्र पाळीवर असलेल्या २ पोलिसांनी पेठ रोडवरील मार्केटच्या परिसरात पैसे घेऊन, चौकशी न करता सोडून दिल्याचा आरोप पीडितेने व तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच पोलीस संशयित नराधमांना पाठीशी घालत असल्याचा आरोप पीडित महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.