नाशिक - कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत राज्य सरकारने 31 मार्चपर्यत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यात 144 कायद्याअंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून 31 मार्चपर्यंत नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस या दोन्ही कंपन्या बंद ठेवण्यात येणार आहेत.
दोन्ही कंपन्यात मिळून 4 ते 5 हजार कर्मचारी काम करत असून याठिकाणी मोठ्या प्रमाणत चलन, पासपोर्ट आणि स्टॅम्प छापले जातात. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य सरकारने 31 मार्चपर्यत अत्यावश्यक सेवा वगळता सगळी दुकाने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याच अनुषंगाने नाशिक रोड येथील करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेसमधील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने 31 मार्चपर्यंत या दोन्ही कंपन्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटनेशी चर्चा झाली आहे. आम्ही वार्षिक टार्गेट पूर्ण केले असून 20 मार्चपर्यंतचे 99 टक्के काम पूर्ण झाले असून या निर्णयामुळे देशात कुठलेच आर्थिक संकट येणार नाही, असे करन्सी नोट प्रेस मजदूर संघाचे अध्यक्ष जगदीश गोडसे यांनी सांगितलं आहे.