नाशिक- कोरोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना शहरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने रुग्णांचा जीव गुदमरतोय, अशी परिस्थिती नाशिकमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातील उद्योगांसाठी लागणारे ऑक्सिजन आरोग्य सेवेत वापरण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.
उद्योगांसाठी लागणारा ऑक्सिजन आरोग्य सेवेत वापरण्याचे आदेश नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबधितांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने रुग्णालयाकडून ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत मुंबई, पुणे येथील ऑक्सिजन लिक्विड पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून शहरातील व्यवसायिकांना पुरवठा कमी होत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.
हेही वाचा-वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करण्यावर राज्यांनी निर्बंध लादू नयेत; केंद्राचे आदेश
शहरात सध्या 1 हजार 40 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. येत्या काही दिवसांत हा आकडा कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दुप्पट होऊ शकतो, असा अंदाज वर्तविला जात आहे. शहरात सध्या 35 हजार मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. सध्या, केवळ 9 मॅट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. शहरात केवळ 43 हजार मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध आहेत. हा ऑक्सिजन साठा पुढील 8 दिवस पुरेल एवढाच आहे.
हेही वाचा-सोलापूर जिल्ह्यातील तीन ऑक्सिजन उत्पादक कंपन्या शासनाच्या ताब्यात
गेल्या दोन दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याची ओरड झाल्यानंतर जिल्हा आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना ऑक्सिजनची निर्मिती वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच उद्योगांसाठी लागणारे ऑक्सिजन आरोग्यसाठी वापरणार असल्याचेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.