नाशिक- पोलीस दलात 7 हजार 231 पदांची भरती करण्यात येणार ( Police Recruitment ) असून शिपाई पदावर भरती झालेला कर्मचारी 30 वर्षानंतर निवृत्त होताना खात्रीने पोलीस उपनिरिक्षक होईल, अशा पद्धतीने कालबद्ध पदोन्नतीची रचना करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार ( Minister Ajit Pawar ) यांनी दिली. राज्यातील जुन्या पोलीस ठाण्यांच्या इमारतींचे दुरूस्ती व नुतनीकरणाचा निर्णय घेण्यात अला आहे. त्यातील 87 पोलीस ठाण्याच्या बांधकामांना सुरुवातही झाली आहे. महिला पोलिसांच्या दैनंदिन कर्तव्याची वेळ आठ तासांची करण्यासाठी निर्णय घेण्यात आला असून पोलीस दलासाठी शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
पोलीस दलात 7 हजार 231 पदांची भरती करण्यात येणार -महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या 119 व्या सत्राच्या दीक्षांत समारंभात ( Convocation Ceremony ) बोलत होते. यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, गृह विभागाच्या बळकटीकरणासाठी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. वर्ष 2021-22 च्या अर्थसंकल्पात पोलीसांच्या घरांसाठी 737 कोटी रुपयांची तर यावर्षीच्या अर्थसंकल्पात 802 कोटींच्या तरतूदीसह पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी एकूण 1 हजार 29 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात राज्यात पोलीसांसाठी 1 लाख घरे निर्माण केली जाणार आहेत, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्राच्या पोलीस दलाला गौरवशाली इतिहास आहे. पंजाबमधील दहशतवाद मोडून काढणाऱ्या पोलीस महासंचालक जे. एफ. रिबेरो साहेबांपासून, शहिद तुकाराम ओंबळे यांच्यासारख्या शूर, कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक वाढवला आहे. महाराष्ट्र पोलिसांचा जगात असलेला लौकिक तुम्ही सर्वजण टिकवून महाराष्ट्र पोलिसांचा गौरव वाढवाल, पोलीस दलाचे सामर्थ्य सिद्ध करुन दाखवाल, याबाबत शंका नाही. आपली बांधिलकी ही भारतीय राज्यघटना, नियम व कायद्यांशी असली पाहिजे. जात-पात, धर्म-पंथ, वैचारिक बांधिलकी, राजकीय, सामाजिक, धार्मिक विचारसरणी या गोष्टींना वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात स्थान असणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. तसेच वैयक्तिक आस्थाच पालन घराच्या उंबरठ्याच्या आत करावं, वैयक्तिक आस्थांचे प्रदर्शन टाळल्यास यातूनच देश पुढे जाण्यास मदत होणार आहे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात रूजू होणाऱ्या अधिकाऱ्यांना केले आहे.
मागील वर्षी 9 ऑगस्टला 30 कोटी 60 लाख रुपये खर्च करुन पोलीस अकादमीत बांधलेल्या सिंथेटिक ट्रॅक, टर्फ फुटबॉल मैदान, ॲस्ट्रोटर्फ हॉकी मैदान, नुतन नैसर्गिक जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन केले होते. यापुढच्या काळातही, महाराष्ट्र पोलीसांच्या प्रशिक्षणाचा दर्जा वाढवून दल अधिक सक्षम, समर्थ करण्यासाठी, पोलीस अकादमीत अत्याधुनिक प्रशिक्षण इमारतीसाठी 7 ते 10 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासोबतच आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली आहे.