नाशिक - राज्यासह नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सर्व स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात येत आहेत. यात बुधवारी नाशिकच्या आमदार सीमा हिरे यांच्या घरासमोर निदर्शने करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.
मराठा आरक्षण : मराठा क्रांती मोर्चातर्फे आमदार सीमा हिरेंच्या घरासमोर निदर्शने - सकल मराठा क्रांती मोर्चा
राज्यासह नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात येत आहेत. या अंतर्गत आज नाशिकच्या आमदार सीमा हिरे यांच्या घरासमोर क्रांती मोर्चाकडून आंदोलन करण्यात आले व त्यांना निवेदन सोपविण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभरातील मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात येत आहे. यात स्थानिक लोकप्रतिनिधींनी खुले पत्र देऊन शासनाने आपल्या पक्षश्रेष्ठींकडे मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे मराठा क्रांती मोर्चा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येते. नाशिक शहरात देखील सोमवारपासून सर्वपक्षीय आमदार खासदार यांना निवेदन देण्यास सुरुवात झाली आहे, यात बुधवारी आमदार सीमा हिरे यांच्या घरापर्यंत सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रॅली काढण्यात आली. त्यांच्या घरासमोर निदर्शने करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, या मागणीचे निवेदन सीमा हिरे यांना यावेळी देण्यात आले.
राज्य शासन आणि विरोधी पक्षाने एकत्र येत मराठा आरक्षणासाठीचा मसुदा तयार करावा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केले तसेच सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने यापुढे देखील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी या प्रकारे निवेदन देण्यात येणार असून जे लोकप्रतिनिधी खुले पत्र देऊन आपली भूमिका स्पष्ट करणार नाहीत, त्यांना मतदारसंघात फिरकू देणार नसल्याचा सूचनावजा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
यावेळीे सीमा हिरे यांच्या घरासमोर सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निदर्शने करत राज्य शासन आणि मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच शासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्यांच्या वतीने करण्यात आली. यावेळी सकल मराठा क्रांती मोर्चाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आपण आणि आपला पक्ष मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आग्रही असून सद्यस्थितीत चालू शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक,आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून आपण पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असल्याचे यावेळी सीमा हिरे यांनी सांगितले.