नाशिक - जिल्ह्यातील धात्रक फाटा परिसरातून सावकाराकडून कर्जवसुली वरून दोन बांधकाम व्यावसायिकांचे अपहरण करून बंदुकीचा धाक दाखवत विवस्त्र करून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकारणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुख्य संशयित आरोपी एक राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे.
सावरकरांच्या कर्ज वसुलीचा फटका सर्व सामान्य नागरिकांना बसत असून असाच प्रकार आडगाव परिसरात घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की धात्रक फाटा परिसरात राहणारे बांधकाम व्यावसायिक बबन शिंदे व प्रवीण गांगुर्डे या दोघांनी नाशिकरोड येथील सावकार आबा चौधरी याच्या कडून कर्ज घेतले होते. यात चौधरी याने व्याज ही पूर्ण घेतले आणि घरही गहाण ठेवण्यास भाग पाडले. तरी देखील आणखीन रक्कम वसुली करण्यासाठी दमदाटी सुरू होती. अशात सावकार आणि त्याच्या गुंडांनी या दोघा बांधकाम व्यावसायिकांचे अपहरण करून त्यांना एकलहरा भागातील एका निर्जनस्थळी नेऊन बंदुकीचा धाक दाखवून विवस्त्र करून अमानुष मारहाण केली. या प्रकरणी आडगाव पोलिसात सावकार आबा चौधरी याच्या सह ऋतिक लोहकरे, अमृत विखणकर, ऋतिक भालेराव यांच्या विरोधात अपहरण, अमानुषपणे मारहाण अत्याचार केल्याने अट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोक्याला बंदूक लावत अमानुष मारहाण -
संशयित सावकार आबा चौधरी याने बांधकाम व्यावसायिक प्रवीण गांगुर्डे आणि बबन शिंदे यांच्या डोक्याला बंदूक लावत विवस्त्र करत अमानुषपणे मारहाण केली. यात पीडितांच्या पाठीवर, अंगावर पोंटावर अक्षरशः चाबूकचे व्रण उमटले आहे. शरीरावरील गंभीर जखमा झाल्या असून बेकायदेशीर पणे सावकारी करणाऱ्या सावकारांवर पोलिसांचा धाक आहे की नाही असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.