नाशिक - नाशिकच्या धरण समूह क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा 58 टक्क्यांवर जाऊन पोहोचल्याने आता नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट दूर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दारणा, भावली, वालदेवी धरणातील पाणीसाठा देखील 70-90 टक्क्यांवर
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूह क्षेत्रामध्ये पावसाने दडी दिल्याने धरणातील पाणीसाठा 35 टक्क्यांपर्यंत खालावला होता. परिणामी नाशिक पाणिकपातीचा निर्णय ही प्रशासनाकडून घेण्यात आला होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून गंगापूर धरण समूह क्षेत्रांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे अवघ्या दोन दिवसातच गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा 58 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. याचबरोबर दारणा भावली वालदेवी धरण देखील 70 ते 90 टक्क्यांपर्यंत भरल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र गुरुवारी सकाळपासून पावसाने पुन्हा एकदा विश्रांती घेतली असून जिल्हाभरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान आता गंगापूर धरण 58 टक्के भरल्याने नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट दूर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.