नाशिक - गेल्या २४ तासात शहरात झालेल्या संततधार पावसामुळे आणि गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गाने सोमेश्वर धबधबा प्रवाहित झाला आहे. गंगापूर धरण क्षेत्रातील मुसळधार पावसाने धरण ९९ टक्के भरल्याने धरणातून मोठ्या प्रमाणातून विसर्गाला सुरुवात करण्यात आली आहे.
नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे -
गोदावरी आणि आळंदी नदीच्या संगमावर असलेल्या सोमेश्वर धबधबा त्यामुळे खळाळून वाहतोय तर गोदावरी नदी पात्रात ही पाण्याचा मोठा प्रवाह पाहायला मिळतोय त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर सोमेश्वर धबधबा परिसरातील लोखंडी कठडे तुटल्याने या परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. गेल्या २४ तासात इगतपुरी तालुक्यात आणि धरण क्षेत्रात विक्रमी पाऊस झाल्याने वैतरणा धरण पुन्हा एकदा १०० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. धरणातून सुमारे तीन हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या २४ तासांपासून वैतरणा परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने धरणातून पाण्याच्या विसर्गला सुरुवात करण्यात आली आहे.
मुख्यतः वैतरणा धरणातून मुंबईला पाणीपुरवठा होत असतो. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता पुन्हा एकदा मिटली आहे. इकडे नाशिक शहरात आणि गंगापूर धरण क्षेत्रात सुरु असलेल्या संततधारेमुळे गंगापूर धरण ९९ टक्के भरले आहे. आज सकाळी नऊ वाजता धरणातून १,१०० क्यूसेस, दुपारी १२ वाजता २,००० क्यूसेस, त्यानंतर १ वाजता ६,००० क्यूसेस, दुपारी ४ वाजता धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले व ८,००० क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे. दुपारपर्यंत पावसाची संततधार सुरूच राहिल्याने दुपारनंतर पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.