नाशिक- महाराष्ट्रात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. त्यामुळे जनतेला मास्क वापरण्याची गरज नाही. सोशल मीडियावरून अफवा पसरवल्या जात असल्याने अनेक शहरात मास्कचा काळाबाजार होत आहे. अशांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
नाशिक येथील मानवत क्युरी रुग्णालय येथे कॅन्सर आजारासाठी गुंतागुंतीच्या शास्त्रज्ञांसाठी लागणाऱ्या अत्याधुनिक रोबोटिक यंत्रणा आणण्यात आल्या आहेत. त्याच्या उद्घाटनासाठी मंत्री राजेश टोपे हे नाशकात आले होते.
महाराष्ट्रात एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याने मास्क वापरण्याची गरज नाही. खोकला-शिंक ड्रॉपलेटसमधूनच कोरोनाचा पसार होतो, हे खरे असले तरी राज्यात सोशल मीडियावर काही चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्यांच्यावर सायबर सेलच्या माध्यमातून कारवाई केली जाईल. कोरोना प्रतिबंधाच्या नव्या नियमाबाबत आरोग्य विभाग काळजी घेऊन स्वतःहून सहभागी होईल. सध्या कोरोनाचे सर्वत्र सावट असल्याने गर्दी टाळता आली तर टाळावी, मोठे कार्यक्रम टाळावे, असे आवाहन मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.