नाशिक : नाशिक जिल्ह्यात काही प्रमाणात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली असल्याने स्वॅब चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात यावे. त्याचप्रमाणे 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोना सद्य:स्थितीबाबत आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळबोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, महानगरपालिका आयुक्त रमेश पवार उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केल्या सूचना : पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 71 सक्रीय रुग्ण असून, ते सर्व रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. कोरोनाचा पहिला डोस घेण्याऱ्यांचे प्रमाण 89.5 टक्के, दुसरा डोस 75.24 टक्के नागरिकांनी घेतला असून, बुस्टर डोस आतापर्यंत एक लाख 43 हजार 890 नागरिकांनी घेतला आहे. तसेच कोमॉर्बिड नागरिकांनादेखील बुस्टर डोस देण्याबाबत नियोजन करून रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यात यावेत. जिल्ह्यात 787 मेट्रीक टन ऑक्सिजन क्षमता असून त्यापैकी 346 मेट्रीक टन ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन व औषधसाठा तयार ठेवावा, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
प्राथमिक आरोग्य चाचणी करा : सोमवारपासून सुरू होणाऱ्या शाळांमध्ये पल्स ऑक्सिमीटर व मानवी तापमापक यंत्राची व्यवस्था करण्यात येऊन मुलांच्या प्राथमिक आरोग्य चाचण्या करण्यावर भर द्यावा. शाळा व महाविद्यालयांमध्ये लसीकरणाच्या कॅम्पचे आयोजन करावे, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी बैठकीत सांगितले.