नाशिक -राज्यपाल यांनी वाद होईल असे वक्तव्य करणे शक्यतो टाळावे. राज्यपालांचे मुंबई बद्दल हे वक्तव्य अप्रस्तुत असून वाद नको, राज्यपालांनी नेहमी निर्विवाद असावे असे मत राज्याचे माजी उपमख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आज नाशिक येथे पत्रकारांशी छगन भुजबळ यांनी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.
मुंबईचे महत्व कसे कमी करता -भुजबळ म्हणाले की, मुंबई शहराला भौगोलिक दृष्ट्या अतिशय महत्व असून ब्रिटिशांनी देखील व्यापारासाठी मुंबईला प्राधान्य दिले. मुंबादेवीचा आशिर्वाद मुंबईवर आहेत. मुंबईत ही सुरवातीला कोळी आगरी समाजाची भूमी होती, नंतर पोर्तुगीज या ठिकाणे आले. देशभरातील सगळ्यांनाच मुंबई हे आवडते शहर असून या शहरात अनेक नामवंत मान्यवर राहत असल्याने या शहराला विशेष महत्व आहे. मुंबईत सर्व प्रकारचे लोक आहेत. त्यात अदानी, अंबानींनसारख्या उद्योगपतींना पण मुंबई आवडते. मुंबईला असलेले बंदर, व्यापार,उद्योग, विमानतळ अनेक मुंबईतील कलाकार, गुजराथी, राजस्थानी सर्व धर्मीय हे आपलेच आहेत. त्यामुळे मुंबईचे महत्व कसे कमी करता येईल ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांनी नाशिकचा विकास करावा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौऱ्याबाबत बोलतांना छगन भुजबळ म्हणाले की, रात्री उशिरा मला मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचे निमंत्रण मिळाले. पवार साहेब नाशिक दौऱ्यावर असल्याने बैठकीला जाणे शक्य होणार नाही. परंतु मुख्यमंत्र्यांनी नाशिकला भरभरून द्यावे, विकास करावा असेही ते म्हणाले.
म्हणून मंत्रिमंडळ विस्तार थांबला - शिंदे सरकार शपथविधीला एक महिना होऊन देखील मंत्रिमंडळ विस्तार नाही याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, त्यांच्यासमोर अनेक अडचणी आहेत. सुप्रीम कोर्टाच्या एक तारखेच्या केसकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे हेच मुख्य कारण आहे. त्यामुळे ते मंत्रिमंडळ विस्तारासाठी थांबले असावेत असे सांगत कुठले खाती घ्यायची यावरून भांडण चालू आहेत. पण, मुख्य कारण सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे अशी टिपणी त्यांनी यावेळी केली.