नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असून, शहरात आरोग्यासाठी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. यानंतर जिल्हा प्रशासनाने उद्योगांसाठी होणारा ऑक्सिजनचा संपूर्ण पुरवठा आरोग्यासाठी वळवला. मात्र, यामुळे अनेक उद्योग बंद पडले असून, शासनाने ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी उद्योग संघटनांनीं केली आहे.
नाशिक जिल्ह्यात मागील महिन्याभरापासून कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, रोज 1500 ते 2 हजार नवीन रुग्णांची भर पडत आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 60 हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातचं शहरातील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्याने जिल्हा प्रशासनाने उद्योगांसाठी होणारा 80 ऑक्सिजनचा पुरवठा पूर्णपणे थांबून तो आरोग्यासाठी वळवला आहे. त्यामुळे आता उद्योगांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होत नसल्याने नाशिकमधील उद्योग संकटात सापडले आहेत.