नाशिक -देशात शेतकऱ्यांच्या बाजूने बोलले तर निलंबन होते. मोदी सरकार भांडवलदार धार्जिण कायदे करत असून त्यांनी रेल्वे विकायला काढली, एलआयसीचे खासगीकरण केले. या देशात विकणारे दोघे अन् घेणारे दोघेच असून त्यांना ठराविक लोकांच्या ताब्यात देश द्यायचा आहे, असा आरोप करत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर नाशिक येथे सडकून टीका केली आहे.
शेतकरी जनजागृती परिषदेत बाळासाहेब थोरातांचे केंद्रावर टीकास्त्र ट्रॅक्टर रॅली -
केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे आणि प्रीपेड वीज बिल विधेयकाविरोधात आज (रविवार) नाशिकमध्ये शेतकरी संघटनांच्यावतीने शेतकरी जनजागृती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ट्रॅक्टर रॅली काढून केंद्र सरकार विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.
'कायद्यातील चुका दुरुस्त करण्याची गरज'
नाशिकरोड येथे रविवारी कृषी कायद्याविरोधात ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. रॅली दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, हा मोर्चा खूप मोठा झाला असता मात्र कोरोनाचे संकट बघता गर्दी टाळली. मोदी सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे हे उद्योगपती धार्जिणे आहेत. यातून शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होणार आहे. या कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणात चुका आहेत. त्या चुका दुरुस्त करण्याची गरज आहे. दिल्लीत हजारो शेतकरी या कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. त्यांचा विचार करण्याची गरज आहे. या आंदोलना दरम्यान कित्येक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधानांनी या सर्व गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे, असे थोरात यांनी यावेळी म्हटले आहे.
'बाजार समिती शेतकऱ्यांच्या फायद्याची'
बाजार समित्या शेतकर्यांच्या फायद्यासाठी असून मोदी सरकारला बाजार समिती नको आहे. नवीन कृषी कायद्यामुळे व्यापारी फसवतील आणि तक्रार कोणाकडे करायची तर प्रांत अधिकाऱ्याकडे. त्यामुळे आम्ही म्हणतो कडक कारवाई करा. आम्ही कायदे दुरुस्तीसाठी घेतला आहे. तुम्हाला कायदे रद्द हवे असतील तर विधी मंडळात पत्र जाऊ द्या असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतकर्यांना केले आहे.
'राज्याला सुसंस्कृत परंपरा'
महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेत सध्या नारायण राणेंच्या प्रकरणावरून सुरु असलेल्या वादावरून काँग्रेस नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी टिका करत शिवसेनेलाही राजकारण करताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. आपल्या राज्याला सुसंस्कृत परंपरा आहे, किमान मोठ्या नेत्यांनी तरी काळजी घ्यायला हवी, नवी पिढी आपण कशी घडवणार यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी, अशा पद्धतीचे राजकारण दुर्दैवी आहे. असे ते म्हणाले. यावेळी अनिल देशमुखांच्या प्रकरणावर बोलणे त्यांनी टाळले आहे. सण उत्सवाच्या काळात कोरोना पार्श्वभूमीवर आपण सगळ्यांनीच काळजी घेणे गरजेचे असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले आहे.
शेतकऱ्यांशी केंद्र सरकार बोलायला तयार नाही - राजू देसले
हे संपूर्ण चारी कायदे शेतकऱ्यांच्या विरोधी आहेत. गेले वर्षभर कोरोना असताना देखील शेतकरी तीव्र आंदोलन करत आहेत. परंतु, शेतकऱ्यांशी केंद्र सरकार बोलायला तयार नाही, शेतकऱ्यांवर जो लाठीचार्ज केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी जनजागृती परिषद नाशिकमध्ये आयोजित केली होती. त्याला संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवत हजेरी लावली असल्याचे राजू देसले यांनी सांगितले होते. केंद्र सरकार अशा पद्धतीप्रमाणे शेतकऱ्यांना त्रास देऊ पाहत आहे. आणि हे सर्व उद्योगपतींच्या घशात घालण्याचे काम कसे चालू आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
हेही वाचा -परिवहन मंत्री अनिल परबांना ईडीची नोटीस; संजय राऊत म्हणाले- क्रोनोलॉजी समजून घ्या...