नाशिक :आम्ही बहुतेक जण काल कोल्हापूरला होतो. पण आमचे मुख्यमंत्री व गृहमंत्री मुंबईत होते. मुंबईमध्ये एक खासदार आणि एक आमदार यांनी मातोश्रीला येऊन हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa At Matoshree ) म्हणण्याचा निर्णय ( Navneet Rana Ravi Rana Agitation ) घेतला. कोणी कुठे काय म्हणावं हा ज्याचा त्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे. याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही. पण त्याच्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे, हे भान ठेवायला हवे होते. कोणीच कोणाला उचकवण्याचे काम करु नये, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy CM Ajit Pawar ) यांनी कालच्या प्रकरणावर राणांचे कान ( Ajit Pawar Criticized Rana Couple ) टोचले.
आंदोलन झाली ती चुकीची झाली : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ही चांगली आहे. परंतु कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत आहे, हे चुकीचे आहे. शेवटी कोणत्याही पक्षाचे नेतृत्व ते कार्यकर्त्यांसाठी दैवत असते. त्यामुळे त्या नेतृत्वाच्या बाबतीत बोलणे आणि त्यांच्या घरासमोर आंदोलने करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे आंदोलन झाली ती चुकीची झाली. महाराष्ट्राची संस्कृती परंपरा ही प्रत्येकाने जपली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी सर्वांना केले. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला त्यांचे नेतृत्व हे महत्त्वाचे असते आणि त्यातल्या त्यात मातोश्री हे शिवसैनिकांचे अनेक वर्षापासून श्रद्धास्थान आहे. त्यामुळे त्याठिकाणी जाऊन असे आंदोलन करणे हे चुकीचे होते. समजून सांगितल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी हे समजून घेणे आवश्यक होते. परंतु ते समजून न घेतल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांचं काम हे तपास करण्याचं आहे आणि पोलिस तपास करून पुढील कारवाई करतील.
सुडाचे राजकारण आम्ही करत नाही : सरकार बदलल्यानंतर कोणत्याही विरोधी पक्षाला असं वाटत की, सरकारच्या सांगण्यावरून पोलीस दल काम करते. परंतु आम्ही कोणाला काही सांगितले नाही. आम्ही विरोधी पक्षात होतो आणि सत्तेतही आहोत. पण आम्ही कधीही सुडाचे राजकारण केले नाही. आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळेस आम्हाला असं वाटत होतं की, पोलीस हे सरकारच्या सांगण्यावरून काम करतात. परंतु ते तसे नसते हा गैरसमज दूर करावा.