नाशिक- जिल्ह्यातील सातपूर भागातील शेतकऱ्याने आपल्या मोबाईलवर रिचार्ज करायचा म्हणून 'गुगल पे'चा आधार घेतला. मात्र त्यावरून रिजार्ज झाला नसल्याने त्याने गुगलवर सर्च करून एका व्यक्तीच्या सांगण्यावरून अॅप्लिकेशन डाऊनलोड केले. त्यावर माहिती भरताच बँकेतून ९१ हजार रुपये गायब झाले. रवी भुंदुरे असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
रवी भुंदुरे यांचा गुगल पेवरून दोन वेळा रिचार्ज अयशस्वी झाला. त्यांनी गुगल पेचा ग्राहक क्रमांक ऑनलाईन शोधला. त्यावर कॉल केला असता अज्ञात व्यक्तीने रिचार्ज करण्यासाठी एनडेस्क नावाचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगितले. येथेच त्यांची फसगत झाली.
फसवणूक झालेली माहिती सांगताना शेतकरी समोरच्या व्यक्तीने विचारलेली सर्व माहिती त्यांनी विश्वासाने ऑनलाईन भरली. त्यानंतर काही मिनिटातच बँक खात्यातील रक्कम हळूहळू कमी झाली. आपली फसवणूक होत तर नाही ना अशी शंका येताच त्यांनी मोबाईल स्विच ऑफ केला. तरीही त्यांच्या खात्यातून तब्बल ९१ हजार रुपये गायब झाले. नुकताच द्राक्षे विकून त्यांच्या पदरी दीड लाख रुपये आले होते. मात्र तेही गेल्याने रवी भंदुरे यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहेत. त्यांनी खाते बंद करत पोलिसात धाव घेत फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. गुगलवर चुकीची माहिती असल्याने भंदुरे यांना गंडा घातल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार घेताना खातरजमा करुनच माहिती देण्याचे आवाहन सायबर पोलीस अधिकारी दीपक देसले यांनी केले .
सायबर गुन्हे नियंत्रणात यावे यासाठी पोलिसांकडून जनजागृती केली जाते. तरीही सायबर गुन्हेगार नव्या क्लृप्त्या करून नागरिकांची फसवणूक करतात. गुगलवरील प्रत्येक माहिती खरी असेलच असे नाही. हे माहिती असतानाही अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यामुळे आपली फसवणूक होऊ नये, यासाठी ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या, असे सायबर अधिकाऱ्यांनी सांगितले.