नाशिक - कोरोनामुळे थांबलेल्या अर्थचक्राला काही अंशी गती मिळावी, यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी शहरातील कंटेनमेंट झोनमधील दुकाने वगळता इतर ठिकाणी असलेली दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली. मात्र, पोलीस प्रशासनाकडून शहरातील दुकाने उघडण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे दुकाने उघडण्यावरून व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनामध्ये समन्वय नसल्याने, याचा मोठा फटका शहरातील व्यापाऱ्यांना सहन करावा लागतो आहे.
नाशिकमध्येल दुकाने सुरू करण्यावरुन दुकानदारांमध्ये संभ्रम.. प्रशासनाच्या निर्णयात समन्वयाचा अभाव हेही वाचा...ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा अखंडीत सुरू राहणार.. शासनाशी चर्चा करुन ठरवणार धोरण
मागील दीड महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून संचारबंदी लागू असल्याने नाशिक जिल्ह्याचे अर्थचक्र कोलमडले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीनंतर पोलीस प्रशासनाने दुकाने उघडण्यास परवानगी नाकारल्याने शहरभरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. नाशिक जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला नव्याने बळकटी मिळावी, म्हणून शहरातील कंटेनमेंट भाग वगळता सोशल डिस्टन्ससिंगचे पालन करत आणि सरकारने घालून दिलेल्या नियम, अटींचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीवर मांढरे यांनी मंगळवारी शहरातील दुकानदारांना दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली होती.
दरम्यान, जिल्हाधिकार्यांची परवानगी मिळाल्यानंतर नाशिक शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी बुधवारी आपली दुकाने सोशल डिस्टन्ससिंगचे पालन करत उघडण्याची तयारी केली. काहींनी दुकाने उघडली देखील. मात्र, पुढील काही वेळातच याठिकाणी पोलीस दाखल झाले. त्यांनी दुकानदारांना दुकाने उघडण्यास परवानगी नसल्याचे सांगत दुकाने पुन्हा बंद करण्यास सांगितले. त्यामुळे नाशिक शहरातील व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने एकत्रितपणे निर्णय घ्यावा. नंतरच तो जाहीर करावा जेणेकरून शहरातील व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होणार नाही, अशी मागणी शहरातील व्यापाऱ्यांनी केली आहे.