नाशिक -शहरात काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या तलवारी, चॉपर, चाकूने चार जणांनी मिळून एका कंपनी व्यवस्थापकाची निर्घुण हत्या केली होती. या आरोपींमध्ये दोन शाळकरी मुलांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नाशिक शहराची मेट्रो सिटीकडे वाटचाल सुरू आहे. दुसरीकडे मात्र गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. नाशिक शहरात 20 दिवसांत 8 खुनाच्या घटना घडल्या असून हाणामाऱ्या, चोऱ्या अशा घटनांमध्ये नाशिककर भयभीत आहेत. अशाच अनेक गुन्ह्यांमध्ये किशोरवयीन मुलांचा समावेश दिसून येत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अल्पवयीन मुलांना कायद्याचे संरक्षण असल्याने त्यांना अटक करता येत नाही. त्यामुळे अल्पवयीन गुन्हेगार सध्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
गुन्हेगारीच शॉर्टकट -गुन्हेगारीकडे वळणारा तरुण हा आर्थिक दुर्बळ घटकातील किंवा सर्वसामान्य घरातील असल्याचे अनेक गुन्ह्यामध्ये दिसून येत आहे. तरुण वर्ग हा केवळ मौजमजेसाठी आणि झटपट श्रीमंत होण्यासाठी गुन्हेगारीचा शॉर्टकट शोधू लागल्याचे दिसते. हा शॉर्टकट तरुणाईला जरी सुरक्षित वाटत असला तरी तो थेट तुरुंगात घेऊन जाणारा आहे. तरुणाईने आपले तारुण्य कारावास भोगूण्याऐवजी चांगले जीवन जगण्यासाठी सार्थकी लावावे जेणेकरून देशाला आणि समाजाला त्याचा उपयोग होईल, असे पोलीस अधिकारी सांगता.