नाशिक- राज्यात 21 ऑक्टोबरला विधानसभेची निवडणूक होत आहे. तर, 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मतदान झाल्यावर मतमोजणी दोन दिवसांनंतर का? ईव्हीएम मशीनचा घोळ करण्यासाठी का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. ते नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
आजपर्यंत झालेल्या निवडणुकांत मतदान झाल्यावर दुसऱ्या दिवशी मतमोजणी होत असते. मात्र, आता ईव्हीएम मशीन आहे, एक बटन दाबल्यावर कोणाला किती मतदान झाले हे समजते. असे असतानाही मतमोजणीसाठी उशीर का? असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला. भाजप जेवढ्या जागा निवडून येणार असे सांगते, तेवढ्याच जागा निवडून येतात. मग ईव्हीएम मशीनमध्ये गडबड तर होत नसेल ना? असा प्रश्न आपोआप नागरिकांना पडत असल्याचे भुजबळ म्हणालेत.
हेही वाचा- जनता युती सरकारला त्रासली असून आम्हाला पुन्हा सत्तेत बसवणार - बाळासाहेब थोरात