नाशिक - मित्रपक्षांचा दबाव असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रार्थनास्थळं खुली करण्याचा निर्णय घेत नसल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. राज्यात काही ठिकाणी प्रार्थनास्थळं सुरू करण्याची मागणी होत आहे. या मुद्द्यावर विरोधीपक्ष देखील आक्रमक झाला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळं पोलीस बंदोबस्तात खुली करावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. सरकारने जनभावनेचा विचार करावा, असे ते म्हणाले.
मंदिरं बंद ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर 'दोन्ही' कॉंग्रेसचा दबाव नाशिकमध्ये आल्यानंतर रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोरोना काळात मुख्यमंत्र्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे कोरोना वाढला, असा आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरेंचं सरकार तीन पायांचं आहे. त्यामुळे कामाचा वेग कमी आहे, असे आठवले म्हणाले. ठाकरे आमच्यासोबत आल्यास त्यांचा वेग वाढेल, असे सांगत आठवलेंनी सेनेला अप्रत्यक्षरीत्या चुचकरण्याचा प्रयत्न केला.
शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या
पावसामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकर्यांना तातडीने मदत दिली पाहिजे. पैसे नसल्यास कर्ज काढून मदत करा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. नुकसान झालेल्या संपूर्ण पिकाची भरपाई द्यावी. सरकारचा सातबारा कोरा होण्याची वेळ आली तरी, शेतकऱ्यांचा सातबारा अद्याप कोरा करण्यात आलेला नाही. यासाठी सरकारने पावलं उचलावी, असे ते म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे साध्य करण्याचे त्यांनी सांगितले.
बाॅलिवूड मुंबईतच राहायला हवे
ड्रग्ज घेणाऱ्या लोकांना काम दिले तर, आरपीआय शूटिंग बंद पाडेल, असा इशारा आठवलेंनी दिला. अनुराग कश्यपला अद्याप अटक नाही. अशा केसमध्ये वेळकाढूपणा नको. फिल्ममध्ये काम मिळवण्यासाठी महिलांवर अत्याचार होत आहेत. अशा महिलांनी पुढे येऊन तक्रार करावी, अशी मागणी त्यांनी केली. फिल्म इंडस्ट्री मुंबईमध्येच राहायला हवी, असे ठाम मत आठवले यांनी व्यक्त केले आहे.