नाशिक - कोरोना काळात नाशिक शहरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरात 1 मार्च ते 22 जूनपर्यंत 69 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या असून त्यापैकी केवळ 7 मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.
मार्च महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत असताना अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत गेले. विविध पोलीस ठाण्यात विविध कारणातून मुली घर सोडून गेल्याची नोंद करण्यात आली आहे. यातील बहुतांश मुली 15 ते 17 वयोगटातील आहे. लॉकडाऊन काळात सर्वच जण घरात होते. अशात अनेकांनी मोबाइलवर सोशल मीडियाचा सर्रास वापर केला. यातून अनोळखी व्यक्तींशी बोलणे, यातून निर्माण झालेले प्रेमसंबंध हे अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता होण्याचे मुख्य कारण ठरत आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी सर्वधिक अपहरणाचे गुन्हे अंबड आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. या दाखल गुन्ह्यातील सात मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले असून इतर मुलींचा शोध सुरू आहे.
मुलांशी संवाद वाढवा..
या पिढीतील मुलांवर मोबाईलचा मोठा परिणाम होत आहे. पालकांनी आपल्या मुलांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांचे मन जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मुलांबरोबर मैत्रीपूर्ण संभाषणामुळे विश्वासाचे नाते दृढ होऊन पुढील मोठे दुष्परिणाम टाळले जाऊ शकतात, असे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हेमंत सोननीस यांनी व्यक्त केले.