नाशिक- येथील भगूर जवळील दोनवाडे येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. भगूर जवळील दोनवाडे गावातील माळ्याच्या घरात शिरोळे कुटुंब राहते. याच घराच्या ओट्यावर 1 मे रोजी सायंकाळी 7 वाजता रुद्र राजू शिरोळे हा चार वर्षांचा चिमुरडा खेळत होता. कुटुंबातील इतर सदस्य घरात असताना घराच्या बाजूला असलेल्या झुडपातून येत बिबट्याने रुद्रवर हल्ला केला आणि त्याला बाजूला असलेल्या शेतात ओढत घेऊन गेला.
भगूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू
रुद्र राजू शिरोळे असे त्या मृत चिमुरड्याचे नाव आहे.
भगूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू
घरातील काही सदस्यांनी हा प्रसंग बघितल्यावर आरडाओरडा करताच आजूबाजूच्या नागरिकांनी शेतात धाव घेत रुद्रचा शोध घेतला. त्यानंतर काही अंतरावर रुद्र गंभीर अवस्थेत जखमी मिळून आला. त्याला तात्काळ देवळाली कॅम्पच्या विजय नगर भागातील गुरव हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर शिरोळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.