नाशिक -नाशिक शहराच्या सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन ( Smart City Corporation Company ) अंतर्गत गाजावाजा करून पीपीपी तत्त्वावर सुरू केलेला पब्लिक बायसिकल शेअरिंग प्रकल्प डब्यात गेलाय, या प्रकल्पात 20 कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन कंपनीने हिरो युऑन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी पब्लिक बाइसिकल शेअरिंग प्रकल्पाचे पीपीटी तत्त्वावर काम दिले होते. यानंतर 10 ऑक्टोबर 2018 पासून नाशिक शहरात सायकल प्रकल्प सुरू ( Smart Cycle Project ) करण्यात आला. नागरिकांचा चांगला प्रतिसाद वाढल्यानंतर शंभर डॉकिंग स्टेशन व एक हजार सायकल शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र, कालांतराने नागरिकांचा प्रतिसाद कमी होत गेला. अशात हिरो युऑन कंपनीनेही या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले. अशा सायकल नादुरुस्त होणे, चोरीला जाणे असे प्रकार वाढले, या बाबी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी कंपनीला वारंवार निदर्शनास आणून दिल्या. मात्र कंपनीने सातत्याने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर होरो युऑन सोबतचा करार रद्द झाला आणि हा प्रकल्प गुंडाळला गेला.
घोटाळ्याचा संशय -नाशिक म्युन्सिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या इतिवृत्तात पब्लिक बायसिकल शेअरिंगसाठी 28.23 कोटी रुपये खर्च झाल्याचे नमूद आहे. मात्र, कंपनीकडून या संदर्भात काढण्यात आलेल्या निविदांमध्ये अंदाजे प्रकल्प किंमत नमुद करणे. पब्लिक बाइसिकल शेअरिंग प्रकल्पाच्या हिशोब न ठेवणे. जमाखर्च माहिती नसणे असे प्रकारचे गंभीर प्रकार दिसून आलेत. वास्तविक कोणत्याही कामाच्या निविदामध्ये नमूद नियम नियमावलीप्रमाणे याची प्रत्यक्ष खबरदारी ही स्मार्ट सिटी कंपनीची आहे, असे असताना ही जबाबदारी स्मार्ट सिटी कडून पार पाडण्यात आली नाही.
2 लाखाला एक सायकल -पब्लिक बायसिकल शेअरिंग प्रकल्पसाठी 28 कोटी पैकी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आठ कोटी रुपये खर्च जरी गृहीत धरला तरी, 1 हजार सायकलीसाठी 20 कोटी रुपये खर्च झाले का? अर्थात 2 लाखाला एक सायकल विकत घेतली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकल्पात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा संशय असून याबाबत सामाजिक कार्यकर्ते देवाग जानी यांनी माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहिती वरून उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी केली आहे.