नांदेड- लोकसभा निवडणुकीत जनता दलाने ( सेक्युलर ) काँग्रेस आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे. नांदेड लोकसभा मतदार संघात देखील काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांना आमचा पाठिंबा असल्याची माहिती जनता दलाचे ( सेक्युलर ) प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शरद पाटील यांनी नांदेड येथे पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना शरद पाटील म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत राज्यात जनता दलाने एकही उमेदवार उभा केलेला नाही. परंतु धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासठी पक्षाने काँग्रेस आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार खासदार अशोक चव्हाण यांना जद ( सेक्युलर ) चा पाठिंबा आहे. देशात गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदी यांची हुकुमशाही सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. जातीयवादी शक्तीने थैमान घातले आहे. समाजात जातीय द्वेष पसरविण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत धर्मनिरपेक्ष विचारांचे सरकार सत्तेत येणे गरजेचे आहे, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
अशोक चव्हाण म्हणाले, की धर्मांध आणि जातीयवादी शक्तींचा मुकाबला करण्यासाठी धर्मनिरपेक्ष विचारांचे पक्ष काँग्रेस आघाडीत एकत्र आले आहेत. त्यामुळे आमची प्रदेशात ताकद नक्कीच वाढली आहे. जनता दल ( सेक्युलर ) ने काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला चांगले यश मिळेल, असा विश्वास चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
विरोधकांनी मला नांदेडमध्ये प्रचारात गुंतवून ठेवले आहे, या आरोपात तथ्य नाही. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ मी विदर्भात प्रचारसभा घेतल्या आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागपूर व पुणे येथे होणाऱ्या सभांना देखील आपण उपस्थित राहणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आता विकासाचा कोणताही मुद्दा शिल्लक राहीला नाही. त्यामुळे हिंदुत्वाचे कार्ड आता त्यांनी काढले आहे. भाजपच्या कारभाराला जनता कंटाळली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून अब्दुल सत्तार यांनी उमेदवारी मागितली नव्हती. त्यांचा सिल्लोड मतदारसंघ जालना मतदार संघात येतो. त्या ठिकाणाहून त्यांनी निवडणूक लढवावी, असा पक्षाचा आग्रह होता. परंतु अब्दुल सत्तार यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. त्यामुळेच जालना व औरंगाबाद येथील उमेदवार पक्षाने जाहीर केले. सत्तार हे अद्यापही काँग्रेस सोडून गेलेले नाहीत, असे स्पष्टीकरण चव्हाण यांनी यावेळी दिले.
पत्रकार परिषदेला काँग्रेसचे आमदार डी. पी. सावंत, आमदार शरद रणपिसे, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर तसेच सूर्यकांत वाणी, जि. प. सदस्य मनोहर शिंदे, गंगाधर शिंदे, निलेश पावडे, श्याम दरक यांची प्रमुख उपस्थिती होती.