नागपूर -आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वाढीव वीज बिलांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. मात्र नागपुरात याच विषयाला धरून विदर्भवादी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नागपूर-कामठी मार्गावरील महावितरणच्या उपकेंद्रवर धडक मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती दर्शवली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात करताच आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी सर्व विदर्भवादी आंदोलकांना ताब्यात घेतले. विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे मागील काही महिन्यांपासून वाढीव वीज बिलांच्या विरोधात सातत्याने आंदोलनं केली जात आहेत. आज देखील विदर्भवाद्यांनी पॉवर ग्रीडसमोर आंदोलन सुरू केलं. यामुळे पोलिसांना अतिरिक्त बंदोबस्त तैनात करावा लागला होता. आजच्या आंदोलनात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण सर्वाधिक होते.