नागपूर - १९७९ साली नागपूर येथून हरवलेल्या आजी चक्क ४१ वर्षानंतर मध्यप्रदेश राज्याच्या दमोह जिल्ह्यातील कोटाटाला या छोट्याशा गावात सापडल्या आहेत. पंचफुलाबाई शिंगणे असे या नशीबवान आजीचे नाव आहे. पंचफुलाबाई हरवल्यापासून ते सापडण्यापर्यंतची कहाणी एकाद्या चित्रपटाला शोभणारीच आहे.
हेही वाचा -.ऐकावं ते नवलच; महिलांनी 'यासाठी' नळाची पूजा करुन बांधली लिंबू -मिरची
तब्बल ४१ वर्ष आजीची निस्वार्थ सेवा करणाऱ्या खान कुटुंबीयांनी सोशल मीडियाचा वापर करून आजीचे मूळ गाव शोधून काढले. त्यानंतर हरवलेल्या आजीला त्यांच्या रक्ताचे नातलग मिळाले आहेत. मात्र, आता ४१ वर्षाच्या या प्रदीर्घ काळात ज्या कुटुंबाने या आजीची निस्वार्थपणे सेवा केली त्या कुटुंबाचा प्रत्येक क्षणी आजीच्या आठवणीत जात असल्याने विरहाचे दुःख असह्य होत असल्याच्या भावना खान कुटुंबीयांनी व्यक्त केल्या आहेत. तर ४१ वर्षांनी आजी परत आल्याने शिंगणे कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
पंचफुलाबाई शिंगणे यांचा व्हायरल केलेला व्हिडिओ... २२ जानेवारी १९७९ सालची ही घटना आहे. त्यावेळी ५३ वर्षीय पंचफुलाबाई शिंगणे त्यांचा मुलगा भय्यालालकडे नागपूरला आल्या होत्या. मानसिक रूपाने आजारी असलेल्या पंचफुलाबाई नव्याने नागपूरची ओळख होत असताना त्या अचानक बेपत्ता झाल्या. त्यावेळी भय्यालाल यांनी आईचा शोध घेण्यासाठी अख्ख नागपूर पिंजून काढलं. मात्र, आईचा शोध लागलाच नाही. शिंगणे कुटुंबीयांचे मूळ गाव अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील खांजमा नगर येथे आहे. कदाचित आई गावी परत गेली असेल या आशेने भय्यालाल यांनी संपूर्ण अचलपूर तालुक्यासह अमरावती जिल्हासुद्धा पालथा घातला, पण दुर्दैवाने त्यांचा शोध लागलाच नाही. त्यानंतर पुढील काही वर्षे पंचफुला यांचा शोध घेण्यात आला, मात्र त्या आता सापडणे अश्यकच आहे या भावनेतून त्यांचा शोध थांबवण्यात आला होता. तर दुसरीकडे पंचफुलाबाई नागपुरातून थेट मध्यप्रदेश राज्यात जाऊन पोहचल्या होत्या.
हेही वाचा -जगातील सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या यादीत भारत 'या' स्थानावर, जाणून घ्या आकडेवारी
नागपूरपासून सुमारे पाचशे किलोमीटर दूर असलेल्या दमोह जिल्ह्यातील कोटाटाला या छोट्याशा गावाशेजारी असलेल्या एका झाली खाली त्यांनी आपली तोडकी-मोडकी राहुटी तयार केली होती. बोलीभाषेची अडचण येत असल्याने त्या कुणाशीही बोलतच नसत. मिळेल ते अन्न खाऊन त्या आला दिवस पुढे ढकलत होत्या, मात्र डोळ्यासमोर दिसणाऱ्या प्रत्येक माणसात त्या स्वतःचा मुलगा भय्यालाल यांनाच शोधत होत्या. एके दिवशी त्यांच्यावर मधमाशीने हल्ला केला तेव्हा त्यांना होत असलेल्या वेदना नूर खान नामक व्यक्तीला बघवल्या नाहीत. त्यांनी आपले ट्रॅक्टर थांबवून पंचफुला यांना मदत केली होती. पंचकुला यांना झाडाखाली बसवून नूर खान परत आपल्या कामावर निघून गेले. मात्र, ज्यावेळी ते परत आले तेव्हा पंचफुला तिथेच बसलेल्या होत्या.
तब्बल ४१ वर्षांनी पंचफुलाबाई यांना मिळाले स्वतःचे कुटुंब त्यावेळी नूर खान यांनी पंचफुला यांना आपल्या घरी आणले आणि स्वतःची बहीण समजून त्यांची सेवा सुरू केली. केवळ नूर खान हेच नाही, तर संपूर्ण खान कुटुंबीयांनी पंचफुलाबाई यांना आपल्याच कुटुंबातील भाग मानले होते. सुमारे चार दशक निघून गेल्यानंतर पंचकुलाबाई या रक्ताचे नाते विसरून खान कुटुंबियांच्या सुखदुःखात एकरूप झाल्या होत्या. या काळात नूर खान यांचा इंतकाल (निधन) झाले. तोवर नूर खान यांचे चिरंजीव इफरार खान मोठे झाले होते. त्यांच्या हातात स्मार्ट फोन येताच त्यांनी सर्वात आधी पंचफुलाबाई यांना त्यांचे कुटुंबीय मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू केला. इफरार यांनी २०१८ साली पंचफुलाबाई यांचा एक व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही, मात्र इफरार यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. पंचफुलाबाई यांना केवळ खांजमा नगर आणि पथरोट याच गावांची नावे लक्षात असल्याने इफरार यांनी गूगल मॅपवर या गावांचा शोध सुरू केला. तेव्हा पथरोट हे गाव अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात असल्याचा शोध त्यांना लागला.
त्यानंतर तिथल्या ग्रामस्थांशी संपर्क साधून पंचकुलाबाई संदर्भात माहिती दिली आणि व्हिडिओसुद्धा पाठवला. तेव्हा गावातल्या जुन्या लोकांनी ती महिला पंचफुलाबाई असल्याची ओळख पटवली. मात्र, या दरम्यान २०१७ मध्ये पंचफुलाबाई यांचा मुलगा भय्यालाल याचेदेखील निधन झाले. त्यामुळे भय्यालाल यांच्या पत्नीने आपल्या सासूला लगेच ओळखले. त्यानंतर पंचफुलाबाई यांचा नातू पृथ्वी हा त्यांना घेण्यासाठी दमोह येथे गेला असता पंचफुलाबाई लगेच त्यांच्यासोबत येण्यासाठी तयात झाल्या, मात्र खान कुटुंब त्यांना परत जाऊ देण्यास इच्छुक नव्हते.
दरम्यान, ४१ वर्ष सेवा केल्यानंतर आता शेवटचे कार्यसुद्धा दमोह येथेच व्हावे अशी सर्व ग्रामस्थांची इच्छा होती. पण शेवटी निर्णय पंचफुलाबाई यांना घ्यायचा होता. प्रेमाच्या नात्यावर रक्ताचे नाते भारी पडले आणि पंचफुलाबाई तब्बल ४१ वर्षांनी नागपुरला परत आल्या आहेत. या काळात सर्व काही बदललेलं असले तरी ते डोळे अजूनही भय्यालाल यांना शोधत आहेत.