नागपूर - युक्रेन रशियात सुरु झालेल्या युद्धामुळे आमची लेकरं हे अडचणीत सापडली आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. भारत सरकारला हात जोडून विनंती आहे. आमच्या लेकरांना मायदेशी परत आणा, ही हाक आहे नागपुरातील इनरेश लाडे नामक पालकाची ( Ukraine stuck students parents appeal ). नरेश लाडे यांची मुलगी सध्या युक्रेनच्या पूर्व भागात खारकीवमध्ये अडकून ( Indian Student Stuck in Ukraine ) आहे. त्या भागात सर्वत्र गोळीबार आणि हल्ले सुरू असल्याने सरकारला भारतातील पालक साकडे घालत आहेत आणि हात जोडून विनंती करत आहेत. काय आहे परिस्थिती मुलांची जाणून घेऊ या विशेष रिपोर्टमधून...
'भारत सरकारने विशेष प्रयत्न करण्याची गरज'
नरेश लाडे यांची मुलगी श्रेया ही खारकीवमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाला शिकत आहे. कॉलेजपासून काही अंतरावर ती एका इमारतीत मैत्रिणीसोबत राहत आहे. पण युद्ध सुरू झाल्यापासून त्यांना भागात इमारतीच्या तळ मजल्यात (बंकरमध्ये) आपले जीवन जगावे लागत आहे. सध्याच्या परिस्थितीत सुरू असलेल्या हल्ल्यामुळे कुठल्याही क्षणी इमारतीवर हल्ला होण्याच्या भीती असल्याने जीव मुठीत घेऊन एक एक दिवस आयुष्य काढत असल्याचे दुःख श्रेया सांगत असल्याने वडील नरेंद्र आणि आई दर्शिका यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे भारत सरकारने रशियासोबत बोलून या मुलांना काढण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ईटीव्ही भारतशी बोलताना श्रेयाच्या पालकांनी सांगितले.
'खाण्यापिण्याच्या साहित्याचा साठा संपत चालल्याने चिंता'
भारतातील बहुतांशी मुले हे युक्रेनच्या पूर्व भागात म्हणजेच रशियाच्या सीमेपासून अगदी जवळच्या असलेल्या खारकीव शहरांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी गेलेली आहेत. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत असताना विद्यालयाकडून विद्यार्थ्यांवर परीक्षेचे कारण देत घरी जाण्यास बंदी घातली होती. त्यामुळे 15 दिवसांपूर्वी मुले येऊ शकले नाही. पण आता युद्ध सुरू झाल्याने मुलांना परत येण्याचे मार्ग बंद झाल्याने विद्यार्थी अडकून पडले आहे. विशेष म्हणजे याच भागात रशियन सैन्य पोहोचले असून मोठ्या प्रमाणात हल्ले गोळीबार सुरू आहे. त्यामुळे मुलांना बंकरमध्ये रहावे लागत आहे. या ठिकाणी तापमान मात्र उणे डिग्रीवर असताना खाण्यापिण्याच्या साहित्याचा साठा संपत चालल्याने चिंता अधिकच वाढत चालली आहे.