नागपूर-नागपूर-सावनेर मार्गावरील पाटनसावंगी पुलावर भीषण अपघात घडला आहे. मध्यप्रदेशच्या इंदूर व भोपाळहून प्रवाशांना घेऊन नागपूरला येत असलेल्या रॉयल स्टार नामक खासगी प्रवासी बसने मालमोटारीला धडक दिली. यात मालवाहू मोटारीतील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी, बसने मालमोटारीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. दोघेही शेतकरी असून ते मध्यप्रदेशच्या छिंदवाडा येथील रहिवासी आहेत. धनराज वानखडे आणि शिवराम चौरिया, अशी त्यांची नावे आहेत. ते मालवाहू गाडीत बसून नागपूरच्या बाजारात लसूण विकण्यासाठी येत होते. बस चालकाने मालमोटारीला मागे टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, बस चालकाचा अंदाज चुकला यामुळे बस मालमोटारीवर धडकली. या अपघातात मालमोटारीच्या मागच्या बाजूला बसलेले धनराज वानखडे व शिवराम चौरिया यांचा गाडीखाली पडून मृत्यू झाला.