नागपूर - हॉर्न वाजवून देखील दुचाकी बाजुला न घेणाऱ्या दुचाकीस्वारांना जाब विचारला असता, त्यांनीच नशेत ट्रक चालकाला मारहाण केली. यामुळे चिडलेल्या ट्रक चालकाचे रौद्र रुप नागपूरात भर रस्त्यात पहायला मिळाले. रागावलेल्या या ट्रक चालकाने लोखंडी रॉडच्या सहाय्याने दोन्ही दुचाकी भर रस्त्यात फोडल्या.
नागपुरात ट्रक चालकाने मारहाण दुचाकीस्वारांच्या दुचाकी फोडल्या... हेही वाचा...Video: राज ठाकरेंनी सर्वात लहान चाहतीचा पुरवला हट्ट..!
संबंधित ट्रक चालक 12 मार्चला रात्री कंट्रोल वाडी परिसरात ट्रकमधील साहित्य गोदामात घेऊन जात असताना दोन दुचाकीस्वार समोरून हटत नव्हते. त्यामुळे ट्रक चालकाने वारंवार हॉर्न वाजवले. मात्र, मद्यपान केलेल्या दोन्ही दुचाकीस्वारांना ट्रक चालकाचे असे हॉर्न वाजवणे आवडले नाही. त्यामुळे त्या दोघांनी ट्रक चालकाची बेदम पिटाई करत त्याला रक्तबंबाळ केले.
यामुळे रागावलेल्या ट्रक चालकाने देखील मारहाण करणाऱ्या दोन्ही दुचाकीस्वारांना धडा शिकवण्यासाठी ट्रकमधून लोखंडी रॉड काढला. मात्र, तोपर्यंत दुचाकीस्वार दुचाकी सोडून पळून गेले होते. मग काय, ट्रक चालकाने हातातल्या लोखंडी रॉडने भर रस्त्यात दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चुराडा करून टाकला. ट्रक चालकाचा रौद्र अवतार पाहून रस्त्यावरची वाहतूक काहीवेळी थांबली होती. अनेकांनी या ट्रक चालकाचा व्हिडीओ बनवला. चार दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या या व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी सदर चालकाविरोधात गाड्या फोडल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर, ट्रक चालकाच्या तक्रारीवर दोन्ही दुचाकी स्वारांविरोधात मारहाणीचा गुन्हा नोंदवला आहे.