नागपूर - मोबाईल दुकाने फोडून लाखोंचे मोबाईल्स चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव अभिजित उर्फ आपजीत पांडे असे आहे. पोलिसांनी त्याच्या बरोबर एका अल्पवयीन साथीदारालासुद्धा ताब्यात घेतले आहे.
गेल्या महिन्यात १८ तारखेला या आरोपींनी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या वाठोड्यातील 'एम.एस. इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड मोबाईल शॉप' हे दुकान फोडले होते. आरोपींनी त्या मोबाईल दुकानातून वेगवेगळ्या कंपन्यांचे ४० मोबाईल्स आणि रोख रक्कम असा एकूण साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेचा तपास करताना सीसीटीव्हीचे काही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते, त्याच्या आधारे नंदनवन पोलीस ठाण्याचे अधिकारी दत्ता पेंडकर यांनी आरोपींचा शोध सुरु केला होता.