नागपूर -शहराच्या विविध भागातून तब्बल 50 ते 60 पेक्षा अधिक दुचाकी वाहन चोरून त्याचे पार्ट्स भंगारमध्ये विकणाऱ्या टोळीच्या तीन सदस्यांना नागपूर शहरातील यशोधरानगर पोलिसांनी अटक केली आहे. तर उर्वरित 4 आरोपींचा शोध सुरू आहे. दुचाकी चोरल्यानंतर टोळी एका घरात गाडीचे पार्ट्स काढले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकत 6 दुचाकी आणि चार कापलेल्या दुचाकी आढळून आल्या आहेत. यशोधरानगर पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून यामध्ये विक्की राजबहादूर शाहू, भूषण बरगट आणि टेमकुमार बनिया या आरोपींचा समावेश आहे.
यशोधरानगर पोलिसांना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहीतीनुसार, काही संशयित व्यक्ती विनोबा भावे नगर गेट समोर उभे असून त्यांच्याकडे चोरीचे वाहन आहे. माहीती मिळताच पोलिसांचे एक पथक तत्काळ विनोबा भावे नगर गेट जवळ दाखल झाले. पोलिसांना बघून ते तिघांनी पळ काढला. मात्र पोलिसांनी योग्य सापळा रचत शिताफीने तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली तेव्हा त्यांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यात सहभागी आल्याचे कबूल केले. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या माहिती वरूनच पोलिसांनी त्यांच्या वर्कशॉपमध्ये धाड टाकली.