मराठा आरक्षण : राज्य सरकारला दिलेला अवधी संपतोय.. तात्काळ निर्णय घ्या, अन्यथा पुन्हा आंदोलन - संभाजीराजे
मराठा समाजाने आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारला दिलेला वेळ संपतो आहे, त्यामुळे आजपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सकारात्मक घोषणा राज्य शासनाने केली नाही तर पून्हा मराठा समाज मूक आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरेल, असा इशारा संभाजी राजे छत्रपती यांनी दिला आहे.
नागपूर - मराठा समाजाने आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारला दिलेला वेळ संपतो आहे, त्यामुळे आजपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सकारात्मक घोषणा राज्य शासनाने केली नाही तर पून्हा मराठा समाज मूक आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरेल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिला आहे. ते आज नागपूर येथील प्रेस क्लब मध्ये आयोजित अनौपचारिक चर्चेदरम्यान बोलत होते. आरक्षणाच्या मुद्यावर सुरू असलेल्या राजकारणामुळे मराठा समाज दुःखी आणि व्यथित झाला असल्याचे देखील ते म्हणाले.
राजकीय इच्छाशक्ती असल्यास मराठा समाजाचे प्रश्न दोन दिवसात मार्गी लागू शकतात. त्यामुळे मी राज्यातील अनेक नेत्यांना भेटलो. दरम्यानच्या काळात कोल्हापूर आणि नाशिक येथे मूक मोर्चे काढण्यात आले, त्यावेळी राज्य सरकारने मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मकता दर्शवली होती, त्यानंतर राज्यभर दौरा करून संवाद यात्रा काढल्याची माहिती छत्रपती संभाजी राजे यांनी दिली. राज्यातील नेत्यांनी आता आरक्षणाच्या पर्यायावर बोलण्याची गरज असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.