नागपूर- तब्बल दोन वेळा नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक आणि एक वेळेस स्थायी समिती अध्यक्षपद भूषवलेले काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले देवराव तिजारे आज अतिशय हालाकीच्या परिस्थितीचा सामना करत जीवनाचा गाडा हाकत आहेत. दत्ता मेघे यांचे बोट धरून राजकारणात आलेले देवराव नागपुरच्या राजकारणात इतके रुळले की त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक नफा तोट्याची पर्वा न करता स्वतःला जनसेवेसाठी समर्पित केले. त्याकाळी देवराव हे दत्ता मेघे यांच्यासोबतच शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जायचे, मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांची आर्थिक परिस्थिती खालावत गेली आहे. तर, ज्यांना देवराव यांनी मोठं केलं त्यांची आर्थिक उन्नती होत असताना त्यांनी त्यांच्या सुखातच आपले सुख मानले आहे. आज देवराव तिजारे खासगी सुरक्षारक्षक म्हणून काम करत असले तरी त्यांच्या मनात काँग्रेस आणि दत्ता मेघेंविषयी कमालीची आस्था बाळगून आहेत. परिस्थितीशी लढताना मी खंबीर आणि सक्षम असल्याने मला माझा आत्मसन्मान जपायचा असल्याचे ते सांगतात.
माजी स्थायी समिती अध्यक्ष करतायेत सुरक्षारक्षकाची नोकरी...पाहा ई टीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट हेही वाचा -कोरोनाबाधित आजीला तरुणाच्या रुपात भेटला 'देव'; स्वतःच्या पाठीवर उचलून रुग्णालयात केले दाखल
देवराव उपासराव तिजारे अशी या माजी नगरसेवक आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष राहिलेल्या वृद्धाची ओळख. वय वर्ष ७२ मात्र त्यांच्यातील ऊर्जा नव्यातरण्या राजकीय मंडळींना लाजवेल अशीच आहे. देवराव तिजारे रात्रभर खासगी सुरक्षारक्षक म्हणून काम करतात आणि कुटुंबा गाडा हाकतात. त्यानंतरही कुठलाही आराम न करता ते थेट नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दिवसभर महानगरपालिकेत झटत असतात. कुठलीही अपेक्षा किंवा लालसा मनात न बाळगता जनतेची निस्वार्थ सेवा करण्यासाठी ते अविरतपणे सक्रिय आहेत.
आज नागपुरात काँग्रेस पक्षाचे अवस्था फारच दयनीय झाली असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात, मात्र सुमारे चार दशकं पूर्वी नागपुरच्या स्थानिक राजकारणात काँग्रेसचा वरचष्मा होता. त्यावेळी काँग्रेसचे नगरसेवक एकाद्या मुद्यावर पोटतिडकीने बोलायचे, प्रश्न तडीस घेऊन गेल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाहींत, त्या काळच्या नगरसेवकांपैकीच एक आहेत देवराव तिजारे. आजही पक्षाने जबाबदारी दिली तरी पुन्हा निवडणूक लढण्याची त्यांची तयारी आहे. ऐन तरुणत्यात असताना त्यांना विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्या विचारांनी प्रेरित झाल्यानंतर ते सक्रिय राजकारणात आले. तेव्हा दत्ता मेघे यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले. तेव्हापासून तर आज र्यंत देवराव सतत समाजाची सेवा करत आहेत, मात्र सध्या त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.
हेही वाचा -'राजकीय प्रादुर्भाव होणार नाही, कारण आम्ही फवारणीचे पंप घेऊन फिरतोय'
दोन मुली आणि एक मुलगा यांच्या शिक्षणासाठी पैसा उभा करण्यासाठी देवराव सुरक्षारक्षक म्हणून काम करत आहेत. तर, त्यांची पत्नीसुद्धा खासगी नोकरी करतात. सर्वात मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे, तर दोन मुलांचे शिक्षण अजूनही सुरू आहे. कधी काळी तेज तरार नगरसेवक असलेले देवराव आज इतक्या वाईट परिस्थितीत जीवन जगत असल्याची माहिती समजताच त्यांचे अनेक स्नेही त्यांना भेटायला येऊ लागले आहेत.
आपणही वडिलांप्रमाणेच राजकीय क्षेत्रात यावे, असे त्यांचा मुलगा ज्ञानेश याला वाटते. पण आजची राजकीय परिस्थिती लक्षात घेता आपल्या कुटुंबातील इतर कुणीही आता राजकारणात जाणार नाही असा निर्धार त्यांनी केला आहे. ज्या पक्षाची इतके वर्ष सेवा केल्यानंतरसुद्धा उपेक्षित जीवन जगावे लागत असले तरी त्यांची पक्षाबद्दल नाराजी नाही.