नागपूर - शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याकडून प्रत्येक खासदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. त्यांच्यामुळेच आम्हाला लोकसभेत आपलं मत किंवा बाजू मांडण्याची काही संधी मिळत नसे. विनायक राऊत आणि अरविंद सावंत हे दोन नेते स्वतःचा एक कलमी कार्यक्रम राबवत होते. त्याला कंटाळून आम्ही आमचा गटनेता बदलला, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे बंडखोर खासदार कृपाल तुमाने यांनी दिली. ते आज ( 22 जुलै ) दिल्लीवरुन नागपुरला आले होते. तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद ( mp krupal tumane allegation vinayak raut ) साधला.
'गटनेता बदलला तरी आम्ही शिवसेनेत' - शिवसेनेचे 12 खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आमदारांपाठोपाठ खासदार देखील शिंदे गटात गेल्याने शिवसेना पक्षातील अंतर्गत बंडाळीला पुन्हा तोंड फुटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तीन दिवसांपूर्वी दिल्लीत घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर बंडखोर 12 खासदारांपैकी एक असलेले रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने आज नागपूरला परत आले आहेत. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत दिले आहेत. शिवसेनेच्या 18 पैकी 12 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लोकसभेचा गटनेता बदलला असला तरी आम्ही शिवसेनेतच आहे, असा दावाही तुमाने यांनी केला आहे.