नागपूर - नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या ( Nandanvan Police Station, Nagpur ) हद्दीत एक निवृत्त डॉक्टर महिलेची हात पाय बांधून गळा चिरून निर्घुण हत्या ( Doctor Woman Murder ) झाली आहे. देवकीबाई जीवनदास बोबडे (वय ७५ वर्ष) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपींनी देवकीबाई बोबडे यांना खुर्चीला बांधून त्यांचा गळा चिरला असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्राथमिक तपासात चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी त्यांची हत्या केली असावी असा अंदाज बांधला जात आहे, त्या अनुषंगाने नंदनवन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घटनास्थळी भेटी -
मृतक देवकीबाई जीवनदास बोबडे यांचे नंदनवन पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या गायत्री कॉन्व्हेंट परिसरात दुमजली निवासस्थान आहे. त्याटीबी हॉस्पिटलमध्ये सेवा देऊन काही वर्षांपूर्वी निवृत्त झाल्या होत्या. निवृत्ती नंतर देवकीबाई या त्यांच्या पती सोबत खालच्या माळ्यावर राहत होत्या, त्यांचे पती आजारी आहेत. वरच्या माळ्यावर त्यांची मुलगी आणि जावई राहतात. ते देखील डॉक्टर आहेत. संध्याकाळपर्यंत देवकीबाई बाहेर न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना आवाज दिला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे घरात जाऊन बघितले असता मन हेलावून टाकणारे दृश्य त्यांच्या नजरेस पडले. घटनेची माहिती समजताच नंदनवन पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित ( Chinmay Pandit, DCP, Crime Branch ) हे देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले होते.