नागपूर- यंदा मान्सून वेळेपूर्वीच येण्याची शक्यता आहे, त्यामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या प्रत्यकाचे डोळे मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. एकदाचा पावसाळा सुरू झाला की शहरातील सकल भागात पाणी साचणे, नागरिकांच्या घरात पाणी घुसणे यासारख्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येतात. शहरातही सर्व नदी, नाल्यांचा गाळ काढण्याचे काम एप्रिल महिन्यात सुरू केले जायचे. मात्र, यावर्षी अजूनही नालेसफाईचे काम पूर्ण झाले नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळ्या पूर्वीच्या तयारीला गती देणे आवश्यक आहे. नदी, नाले आणि पावसाळी नाल्यांचे स्वच्छता कार्य लवकरात लवकर पूर्ण होईल याकडे विशेष लक्ष देऊन शहरातील कुठल्याही रस्त्यावर पाणी साचू नये यादृष्टीने उपाय योजनात्मक कार्यवाही करा, असे सक्त निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. ( Nagpur Municipality Commissioner Radhakrishnan B ) यांनी दिले आहेत. मात्र, दिवस कमी असल्याने पावसाळ्या पूर्वीचे काम पूर्ण होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पावसाळ्यात नदी नाल्यात पावसाचे पाणी साचू नये, पाण्याचा प्रवाह सुरळीत रहावा, पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी शहरातील सर्वात मोठी नदी असलेली नाग नदीची सफाई करण्यात येत आहे. मात्र, आता दिवस कमी शिल्लक राहिले असल्याने नालेसफाई पूर्ण होईल का हा प्रश्न निर्माण झाला आहे. नाग नदीतील ( Nag River ) तसेच विविध नाल्यांमधील गाळ काढण्यात येत असून यासाठी जेसीबीची मदत घेतल्या जात आहे. नाल्यात वाढलेले गवत, कचरा, गाळ काढण्यात येत असून मान्सूनपूर्व सफाईची कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासन तयारीला लागले आहे. शहरात एकूण 58 ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता असल्याचं महापालिकेच्या सर्वेक्षणात समोर आले आहे.