नागपूर -विदर्भ राज्य आंदोलन समिती वाहतूक आघाडीच्यावतीने आज वाहन चालक- मालकांच्या विविध मागण्यांसाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या निवास्थानासमोर 'हॉर्न बजाओ सरकार जगाओ आंदोलन' करण्यात येणार होतं. मात्र, कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याचं कारण देत नागपूर पोलिसांनी आंदोलन सुरू होण्यापूर्वीच आंदोलकांना अटक केल्याने नियोजित आंदोलन होऊ शकले नाही.
वाढत्या इंधन दराच्या विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून हॉर्न बजावो रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं. नागपुरातील यशवंत स्टेडियम ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानापर्यंत कार्यकर्ते रॅलीच्या माध्यमातून हॉर्न वाजवत जाणार होते. मात्र नागपूर मध्ये कोविडची परिस्थिती गंभीर असून रोज वाढत असलेल्या रुग्णसंख्ये मुळे शहरात आंदोलनाला परवानगी देता येणार नसल्याची भूमिका पोलिसांनी घेतली. तरी देखील आंदोलक ऐकायला तयार नसल्याने पोलिसांनी आंदोलन सुरू होण्यापूर्वीच आंदोलकांना ताब्यात घेतले ज्यामुळे आंदोलन होऊच शकले नाही.