नागपूर - २७ जानेवारी पासून राज्यातील वर्ग पाचवी ते नववीचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचे संकट अद्याप दूर झाले नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासंदर्भात पालकांच्या मनातील भीती अद्याप दूर झालेली नाही. या संदर्भात नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
दुसऱ्या टप्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय-
गेल्या महिन्यात नागपूरच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात वर्ग नववी ते बारावी सध्या सुरू आहेत. या दरम्यान कोरोना प्रतिबंधक उपाय योजना सक्तीने लागू केल्यामुळे एकाही विद्यार्थ्यांला शाळेत गेल्यानंतर कोरोनाची बाधा झाल्याची तक्रार आलेली नाही. आता राज्य शासनाने दुसऱ्या टप्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या २७ जानेवारी पासून वर्ग पाचवी ते वर्ग आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.