मुंबई - 2014 च्या विधानसभा निवडणुका आणि 2019 च्या प्रचाराचा एकूण ताळेबंध पाहता, या ठिकाणी भाजपचेच वर्चस्व असल्याचे दिसत आहे. असे असले तरीही वंचित बहुजन आघाडी, एमआयएम या पक्षांनी विदर्भातील काही ठिकाणी आव्हान उभे केले असेल अथवा काँग्रेसने अस्तित्वासाठी केलेली धडपड, अशा कारणांमुळे विदर्भात अनेक बदल होण्याची संभावना आहे..
2014 ची आकडेवारी
- भारतीय जनता पक्ष - 43
- शिवसेना - 4
- राष्ट्रवादी - 2
- काँग्रेस - 10
- इतर - 3
2014 विधानसभा निवडणुकीतील चित्र
2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरवण्यात विदर्भाने महत्वाची भूमिका बजावली होती. राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांपैकी ६२ जागा विदर्भातून येतात. गेल्यावेळी भाजपने विदर्भात ६२ पैकी ४४ जागा जिंकल्या होत्या. प्रस्थापित काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारविरोधातील लाट, शेतकऱ्यांच्या मनातील संताप, सिंचन घोटाळा, जातीची समीकरणे, स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा या सर्व गोष्टी भाजपच्या पथ्यावर पडल्या होत्या.
2019 चे चित्र काय ?
विदर्भ हा भाजप पर्यायाने शिवसेनासहित महायुतीचा प्रबळ गड असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र 2019 च्या निवडणूकीतील एकूण प्रचार आणि राजकीय स्थित्यंतराचा आढावा घेतल्यास, महायुतीला येथे चांगलेच आव्हान असणार आहे. मतदानाचा घसरलेला टक्का आणि लोकांचा अनुत्साह हा नक्कीच विचार करायला लावणार आहे. त्याच प्रमाणे वंचित बहुजन आघाडीने देखील विदर्भातील अनेक जिल्ह्यात आपले संघटन वाढवल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे येथील 62 जागांवर उमेदवार देत वंचितने भाजप प्रमाणेच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या सर्वच पक्षांना मोठे आव्हान उभे केले आहे. विदर्भात एकेकाळी काँग्रेसला मोठा जनाधार होता. 2009 च्या निवडणूकीत काँग्रेसने येथे 23 जागा घेत आपले स्थान दाखवून दिले होते. मात्र याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसला येथे हार पत्कारावी लागली आहे, राज्यातील काँग्रेसचा एकमेव खासदार येथून निवडून आला. सर्व पक्षांचा विदर्भातील एकूण वावर पाहता या निवडणूकीत युतीला प्रामुख्याने भाजपला याचा फटका बसु शकेल. गेल्या वेळी भाजपने विदर्भात ६२ पैकी ४४ जागा जिंकत नेत्रदीपक यश मिळवले होते, तर काँग्रेसला केवळ दहा जागा मिळाल्या होत्या. यावेळी शिवसेनेला सोबत घेत रिंगणात उतरलेल्या भाजपने तब्ब्ल नऊ आमदारांना उमेदवारी नाकारली आणि सेनेला केवळ १२ जागा दिल्या. प्रत्यक्षात सेनेचे बंडखोर उमेदवारच भाजपच्या विजयात मोठी अडचण निर्माण करत असल्याचे चित्र आहे.
महत्त्वाच्या लढती..
- नागपूर दक्षिण पश्चिम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (भाजप) VS आशिष देशमुख (काँग्रेस)
- बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार (भाजप) VS डॉ. विश्वास झाडे (काँग्रेस)
- साकोली - नाना पटोले (काँग्रेस) VS परिणय फुके (भाजप)
- ब्रह्मपुरी - विजय वडेट्टीवर (काँग्रेस) VS पारोमिता गोस्वामी (आप)
- बडनेरा - रवी राणा (अपक्ष) VS प्रीती बंड (शिवसेना)
- मोर्शी - डॉ. अनिल बोंडे (भाजप) VS देवेंद्र भुयार (शेतकरी संघटना)
- आर्वी - अमर काळे (काँग्रेस) vs दादाराव केचे (भाजप)
- देवळी - रणजित कांबळे (काँग्रेस) vs समीर देशमुख (शिवसेना)
- अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले (भाजप) vs मनोहर चंद्रिकापुरे (राष्ट्रवादी)
- अहेरी - अंबरिश अत्राम (भाजप) vs धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी)
- आर्णी - संदीप धुर्वे (भाजप) vs शिवाजीराव मोघे (काँग्रेस) vs राजू तोडसाम (भाजप बंडखोर)
- पुसद - निलय नाईक (भाजप) vs इंद्रनिल मनोहर नाईक (राष्ट्रवादी)
- तिवसा - यशोमती ठाकूर (काँग्रेस) vs राजेश वानखडे (शिवसेना)
विदर्भातील मतदानाचा टक्का घसरला
राज्यात सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. यात विदर्भातील एकूण ६२ जागांसाठी सोमवारी सरासरी 59.11 टक्के मतदान झाले. गोंदिया व भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक 67.33 टक्के तर सर्वात कमी मतदान गडचिरोली व नागपूरमध्ये अनुक्रमे ५२ व ५३ टक्के झाले. मुख्यमंत्री रिंगणात असलेल्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात ४४ टक्के मतदान झाले. विदर्भातील ६२ पैकी जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे भाजपेच उद्दिष्ट आहे. मात्र यावर्षी मतदान कमी झाल्याने भाजपच्या गोटात नक्कीच चिंतेचे वातावरण आहे.