नागपूर - मागील काही दिवसांपासून बर्ड फ्ल्यूचे संकट घोंघावत होते. अखेर हे संकट नागपूर जिल्ह्यात पोहचले आहे. नागपूरच्या ग्रामीण परिसरात काही भागात मृत पक्षी आढळून आले होते. बुट्टीबोरी परिसरातील वारंगा येथील फार्म हाऊसवरील मृत पक्षांचे नमुने बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह आले आहे. यात पूर्व विदर्भात नागपूर नंतर गडचिरोली जिल्ह्यातही बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला आहे. मात्र यापासून घाबरण्याचे कारण नसल्याचेही सांगितले जात आहे.
नागपूर ग्रामीण मधील बुट्टीबोरी लगतच्या वारंगा येथील फार्म हाऊसवर काही पक्षांचा मृत्यू झाला होता. यात खबरदारी म्हणून नमुने गोळा करण्यात आले होते. हे नमुने पुणे येथिल प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यात संशय बळावल्याने भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग संस्थानकडे पाठवण्यात आले. याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या अहवालानुसार नागपूर जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचा पुढे आला आहे.
पूर्व विदर्भात दोन जिल्ह्यात शिरकाव-
राज्यात सुरवातही परभणी, मुंबई, ठाणे, दापोली बीड, या भागात बर्ड फ्ल्यूचचा शिरकाव झाला होता. तश्या उपाययोजना राबवायला सुरवात झाली होती. यात नव्याने आलेल्या अहवालात 28 ठिकाणचे नमुने पाठवण्यात आले होते. यात विदर्भात नागपूर गडचिरोली यांच्यासह महाराष्ट्रात आणखी सहा ठिकाणचे बर्ड फ्ल्यूचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहे.