नागपूर - शहरातील मृत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी वापरण्यात आलेले पीपीई किट स्मशानातच फेकण्यात आल्याचे चित्र पहायला मिळत आहे. याप्रकरणाची दखल घेत, महानगरपालिकेकडून संबंधित स्वच्छता झोनच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात अधिकाऱ्यांना प्रत्येकी १००० रुपये दंड आणि कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे. शहरातील तीन झोनमध्ये ही स्थिती आढळल्याने मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी ही कारवाई केली.
कोरोनाचा संसर्ग रुग्णांपासून इतरांना होऊ नये, यासाठी पीपीई किट वापरले जातात. मृत पॉझिटिव्ह रुग्णांच्या अत्यंसंस्कारा दरम्यान हे किट नष्ट करायचे असतात. परंतु नागपुरातील प्रमुख तीन झोनमध्ये वापरलेले पीपीई किट स्मशानात फेकल्याचे दिसून आले. या प्रकरणाची मनपा प्रशासनाकडून दखल घेण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने घनकचरा व्यवस्थापन विभागाचे लक्ष्मीनगर झोन, नेहरूनगर झोन आणि गांधीबाग झोन या झोनमधील अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. शिवाय प्रत्येकी १००० रुपये दंडही मनपाकडून ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही आयुक्त राधाकृष्णन बी यांनी बजावली आहे. २४ तासांच्या आत याप्रकरणी स्पष्टीकरण दिले नाही, तर मनपा प्रशासनाकडून प्रशासकीय कारवाई सुद्धा केली जाणार आहे, अशी माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.