नागपूर- पाणी कपातीवरून राजकारण पेटले असताना आता नागपूर महापालिकेकडून पाणी कपातीबद्दल महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सुरू असलेली एक दिवसाआड पाणी पुरवठ्याची पद्धत पुढील एक महिन्यासाठी कायम ठेवण्याचा निर्णय नागपूर महापालिकेने घेतला आहे.
पुढील महिनाभर नागपूरला एक दिवसाआडच मिळणार पाणी
नागपूर शहराची एक दिवसाआड पाणी पुरवठ्याची पद्धत पुढील एक महिन्यासाठी कायम ठेवण्याचा निर्णय नागपूर महापालिकेने घेतला आहे.
महापालिकेने सोमवारी एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या निर्णयाचा आढावा घेतला. एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय पुढील एक महिन्यासाठी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे नागपूर शहराला आता बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे 3 दिवस पाणी पुरवठा होणार नाही.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात अत्यल्प पाणी साठा उपलब्ध असल्याने महापालिकेने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच या निर्णयाचा आढावा दर सात दिवसांनी घेण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात एक दिवसाआड पाणी कपातीचा निर्णय घेतल्याने 1260 दशलक्ष घनमीटर पाण्याची बचत झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे.